जम्मू- काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात सुरक्षा दलांनी कंठस्नान घातलेल्या तीन पैकी एक दहशतवादी हा आयपीएस अधिकाऱ्याचा भाऊ असल्याचे समोर आले आहे. शमशूल हक असे या दहशतवाद्याचे नाव असून तो गेल्या वर्षी दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. शमशूलचा एक भाऊ हा आयपीएस अधिकारी असून दुसरा भाऊ महाविद्यालयात प्राध्यापक आहे.

शोपियन जिल्ह्यातील हेफ परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मंगळवारी मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलांनी परिसरात वेढा घातला आणि शोधमोहीम हाती घेतली. यादरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.  शमशूल हक, आमिर सुशील भट आणि शोएब अहमद शाह अशी या तीन दहशतवाद्यांची नावे असून ते तिघेही हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते.

यातील शमशूल हा उच्चशिक्षित कुटुंबातून आल्याचे समोर आले आहे. शमशूल हक (वय २५) हा मूळचा शोपियन जिल्ह्यातील रहिवासी असून तो गेल्या वर्षी घरातून पळाला होता. शमशूलचा भाऊ इनाम- उल- हक हा आयपीएस अधिकारी आहे. इनाम उल हक हे सध्या पूर्वोत्तर राज्यात नियुक्तीवर आहेत. तर शमशूलचा आणखी एक भाऊ हा श्रीनगरमधील सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्राध्यापक आहे.

शमशूल हा दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे समजल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला माघारी परतण्याचे आवाहन देखील केले होते. मात्र, शमशूल घरी परतला नव्हता. शमशूल हा देखील युनानी मेडिसीन आणि सर्जरी याविषयात पदवी घेत होता. शमशूलचा चुलत भाऊ झुबैर हा देखील दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. गेल्या वर्षी १ एप्रिल रोजी एका चकमकीत सुरक्षा दलांनी त्याला कंठस्नान घातले होते.