राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल (१९ मार्च २०१९) राष्ट्रपतीभवनामध्ये शौर्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. लष्कराचे जवान, अधिकारी आणि शहीद जवानांच्या पत्नींचा शौर्य पदक देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांमध्ये जम्मू-काश्मीरमधील एका १६ वर्षीय मुलाचाही समावेश होता. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी या मुलाचा शौर्य चक्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. या मुलाचे नाव आहे इरफान रमजान शेख. दोन वर्षापूर्वी म्हणजेच वयाच्या १४ वर्षी इरफानने जम्मू- काश्मीरमध्ये त्याच्या राहत्या घरावर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हाणून पाडला होता.

इरफानचे वडील रमजान शेख हे जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथील पिपल्स डेमोक्रेटीक पार्टीचे (पीडीपी) स्थानिक नेते तसेच माजी सरपंच आहेत. २०१७ साली १६-१७ ऑक्टोबरच्या रात्री तीन दहशतवाद्यांनी शेख यांच्या राहत्या घराला वेढा घातला. १४ वर्षीय इरफानने घराचा दरवाजा उघडला असता त्याला अंगणामध्ये बंदूका आणि ग्रेनेड घेऊन उभे असलेले तीन दहशतवादी दिसले. ते घराच्या दरवाजाच्या दिशेने चालत येत होते. इरफानने प्रसंगावधान दाखवत या दहशतवाद्यांना घरात येण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. याच झटापटीमध्ये इरफानचे वडील घराबाहेर पडले असता एका दहशतवाद्यांने त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये रमजान शेख गंभीररित्या जखमी झाले. आपल्या वडीलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहूनही इरफान न घाबरता त्यांच्यावर गोळीबार केलेल्या दहशतवाद्यावर तुटून पडला. इरफान हाती लागेल त्या गोष्टीने दहशतवाद्याला मारत सुटला. इरफानने केलेल्या हल्ल्यामध्ये तो दहशतवादी गंभीर जखमी होऊन मरण पावला. इरफानचे ते रुप पाहून बाकी दोन दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. इरफान त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे धावला पण ते दोघे आपल्या साथीदाराचा मृतदेह तेथेच सोडून पळून गेले.

सामान्यपणे शत्रूविरुद्ध लढताना असामन्य शौर्य दाखवणाऱ्या जवनांना शौर्य चक्र पुरस्कार प्रदान केला जातो. मात्र इरफानने लहान वयात दाखवलेल्या शौर्यासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये रमजान गंभीर जखमी झाले तरी इरफानने दाखवलेल्या हिंमतीमुळे त्याच्या कुटुंबियांचे प्राण वाचले. इरफान सध्या दहाव्या इयत्तेत शिकत असून भविष्यात त्याला सनदी अधिकारी व्हायचे आहे.