News Flash

निवडणूक प्रचारात मुखपट्टी अनिवार्य करावी का?

बाजू मांडण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र, निवडणूक आयोगाला नोटीस

(संग्रहित छायाचित्र)

देशातील विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या सुरू असलेल्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान प्रत्येकासाठी अनिवार्यपणे मुखपट्टीचा वापर सुनिश्चित करावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकार व निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली.

उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक आणि ‘सेंटर फॉर अकाउंटेबिलिटी अँड सिस्टिमॅटिक चेंज’ (सीएएससी) या विचारगटाचे अध्यक्ष विक्रम सिंह यांनी केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल व न्या. जसमित सिंग यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार व निवडणूक आयोगाला नोटीस जारी करून बाजू मांडण्यास सांगितले.

कोविड-१९ महासाथीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे वारंवार उल्लंघन करणारे प्रचारक आणि उमेदवार यांना विधानसभा निवडणुकांत प्रचारास मनाई करावी, अशी सिंह यांची मुख्य याचिका आहे. या दोन्ही याचिका न्यायालयाने ३० एप्रिलला सुनावणीसाठी ठेवल्या आहेत.

विधानसभा निवडणुकांच्या काळात सक्तीने मुखपट्टी घालणे व शारीरिक अंतर राखणे यांबाबत निवडणूक आयोगाने डिजिटल, मुद्रित व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांद्वारे जागृती करावी, असे सिंह यांची बाजू मांडणारे अ‍ॅड. विजय गुप्ता म्हणाले. ‘मुखपट्टीच्या सक्तीबद्दल सर्व अधिकाऱ्यांची सहमती असताना हा नियम निवडणूक प्रचारादरम्यान का लागू केला जाऊ नये, यामागे तार्किकता नाही’, असा युक्तिवाद त्यांनी केला.

ज्या राज्यांत व केंद्रशासित प्रदेशांत निवडणुका होत आहेत, तेथे सार्वजनिक जागी व कामाच्या ठिकाणी मुखपट्टी न घालणाऱ्या व्यक्तींवर योग्य तो दंड आकारण्याच्या २३ मार्चच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होईल हे निश्चित करण्याचे

निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, असे सिंह यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:01 am

Web Title: should cover be made mandatory in election campaign abn 97
Next Stories
1 केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन करोना पॉझिटिव्ह
2 देशात सगळ्यांना करोना लस देणं शक्य आहे का? सीरमचे सीईओ अदर पूनावाला म्हणतात…!
3 “करोना लसीसाठीचा कच्चा माल अमेरिका, युरोपनं थांबवला”; सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावालांची माहिती!
Just Now!
X