दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणी जो वृत्तपट काढण्यात आला आहे, त्यावर भारतात बंदी घालण्यात आली असली, तरी तो सोशल मीडियावर उपलब्ध आहे. त्या वृत्तपटात गुन्हेगारांच्या वकिलांनी जी वक्तव्ये केली आहेत, ती महिलाविरोधी असून बार कौन्सिल ऑफ इंडियाने या वकिलांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांचे वक्तव्य, त्या वृत्तपटातील सहभाग हा आक्षेपार्ह असून त्यामुळे त्यांनी गैरवर्तन केले आहे असे बार कौन्सिलने म्हटले आहे.
बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी सांगितले, की आम्ही ‘बीबीसी’च्या त्या वृत्तपटात आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे वकील एम.एल.शर्मा व ए.पी.सिंग यांना नोटिसा बजावल्या आहेत.
त्यांनी सांगितले, की दोन्ही वकिलांनी कनिष्ठ न्यायालयात आरोपींची बाजू मांडली होती पण त्यांनी वृत्तपटातही आक्षेपार्ह वक्तव्ये केली असून वकील म्हणून ती त्यांना शोभणारी नाहीत.
मिश्रा म्हणाले, की हे व्यावसायिक गैरवर्तन आहे की साधे गैरवर्तन आहे हे तपासावे लागेल व नंतर पुढचा निर्णय घेतला जाईल.
वकील कायद्यातील कलमानुसार त्यांना नोटीस देण्यात आली असून त्यांचा वकिलीचा परवाना हा त्यांच्या उत्तराने बार कौन्सिलचे समाधान न झाल्यास रद्द होऊ शकतो.
वकील ए.पी.सिंग यांनी सांगितले, की आपण बार कौन्सिलचा जो निर्णय असेल तो मान्य करू तर दुसरे वकील एम.एल.शर्मा यांनी मात्र आपण काही चूक केलेली नाही असा पवित्रा घेतला आहे.