याकूब मेमनच्या फाशीबाबत दाखवण्यात आलेली तत्परता इतर दहशतवादी खटल्यांबाबत देखील सरकारने दाखवावी, असा टोला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी लगावला आहे. याकूब मेमनला फाशी झाली. दहशतवादाच्या आरोपीला शिक्षा देण्यात सरकार आणि न्यायव्यवस्थेने जी तत्परता दाखवली ती कौतुकास्पद आहे. आता इतर खटल्यांमध्येही जात-पात, धर्म आणि मतांचा विचार न करता सरकार आणि न्यायव्यवस्था अशीच कारवाई करेल, अशी आशा आहे, असे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले आहे. दहशतवादी कारवाया करणाऱया इतर आरोपींवर ज्या पद्धतीने खटला चालवला जात आहे, त्यावर संशय असल्याचेही दिग्विजय यावेळी म्हणाले.

दरम्यान, दिग्विजय यांच्या ट्विटचा समाचार घेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रसने राष्ट्रीय सुरक्षेला बाजूला सारत राजकारण करण्यास प्राधान्य दिल्याचा आरोप यावेळी केला. बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराला फाशी दिल्यानंतर काँग्रेसचे काही नेते वेगवेगळी भूमिका मांडत आहेत. काँग्रेसने त्यांच्या नकारात्मक भूमिकेवर फेरविचार करावा आणि सोनिया गांधी यांनी स्वत: पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, असे अरुण जेटली म्हणाले.