मोदींची न्यायव्यवस्थेवर आणि न्यायमूर्तींची मोदींवर स्तुतिसुमने

सर्व रूढ संकेतांना बगल देत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आर. शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली, तर पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी आणि न्यायमूर्ती शहा शनिवारी गुजरात उच्च न्यायालयाच्या अहमदाबाद येथील हीरक महोत्सव सोहळ्यात दूरचित्रसंवाद माध्यमातून सहभागी झाले होते.

नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याचे आणि व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राखण्याचे आपले कर्तव्य न्यायव्यवस्थेने चोख बजावले आहे, त्याचबरोबर तिने संविधानाचेही रक्षण केले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी न्यायव्यवस्थेची प्रशंसा केली. गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त काढलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते.

सर्व देशांच्या सर्वोच्च न्यायालयांचा विचार करता, करोना महासाथीच्या काळात आपल्या सर्वोच्च न्यायालयाने दूरचित्रसंवाद माध्यमातून सर्वाधिक सुनावण्या घेतल्या, असे पंतप्रधान म्हणाले. देशाची न्याययंत्रणा भविष्यासाठी सुसज्ज करण्याच्या  उद्देशाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची शक्यता पडताळून पाहण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘संविधानाच्या संरक्षणार्थ आपल्या न्यायव्यवस्थेने दृढपणे काम केले, असे प्रत्येक देशवासीय ठामपणे म्हणू शकतो. संविधानाचा रचनात्मक आणि सृजनात्मक अर्थ लावून आपल्या न्यायव्यवस्थेने त्याला बळकट केले आहे’, असे मोदी म्हणाले. चांगल्या प्रशासनाचे मूळ कायद्यात असून, प्राचीन भारतीय शास्त्रांत ते नमूद करण्यात आले आहे. न्यायव्यवस्थेवरील विश्वाासाने सामान्य माणसाला आत्मविश्वाास, तसेच सत्यासाठी उभे राहण्याची ताकद दिली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

डिजिटल इंडिया अभियानातंर्गत न्यायव्यवस्थेचे वेगाने आधुनिकीकरण सुरू असल्याचे मोदी यांनी नमूद केले. आता १८ हजारांहून अधिक न्यायालयांचे कामकाज संगणकीकृत केल्याचे माहिती त्यांनी दिली.

‘पंतप्रधान मोदी चैतन्यमूर्ती, द्रष्टे नेते’ न्यायाधीश म्हणून काम केले, असेही न्यायमूर्ती शहा म्हणाले.    गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनीही, ‘आंतरराष्ट्रीय ख्यातीचे द्रष्टे नेते’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंडभरून स्तुती केली होती. त्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. न्यायमूर्ती मिश्रा आता सेवानिवृत्त झाले आहेत.

न्यायव्यवस्थेचे काम प्रशंसनीय : पंतप्रधान

सर्वोच्च न्यायालयाने दूरचित्र संवाद माध्यमातून सर्वाधिक सुनावण्या घेतल्याचे ऐकून मला अभिमान वाटला. न्यायव्यवस्थेने नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षणही चोखपणे केले आहे.

 – नरेंद्र मोदी, पंतप्रधान