जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने आता भारतातही वेगाने परण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारसह राज्य सरकारकडून सर्वोतपरी खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील धार्मिक स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी काही दिवस मंदिर बंद ठेवण्यात आले आहेत. याच प्रमाणे आता श्री माता वैष्णोदेवी यात्रेला देखील स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याचबरोबर जम्मू-काश्मीरहून येणारी व जाणारी आंतरराज्यीय बस सेवेवर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत.

या अगोदर श्रीनगरच्या एनआयटीनंतर मंगळवारी जम्मूमध्ये आयआयटी व आयआयएमला देखील बंद करण्यात आले. या ठिकाणचे वसतीगृह खाली करून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याता आले. याचबरोबर मुबारक मंडी डोगरा आर्ट-म्युझियम आणि श्रीनगर एसपीएस म्युझियम ३१ मार्च पर्यंत बंद करण्यात आले आहे. तसेच सचिवालयात देखील सामान्य नागरिकांना येण्यापासून मज्जाव करण्यात आलेला आहे. कार्यालयाबाहेर बॉक्स ठेवून लोकांच्या तक्रारी स्वीकारल्या जात आहेत.

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारतात सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. तीर्थस्थळं, चित्रपटगृह, जीम, जलतरण तलाव, शाळा, कॉलेजेस बंद आहेत. कारण या ठिकाणी विद्यार्थी, नागरिक मोठया संख्येने एकत्र येतात. करोना व्हायरस संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही पावले उचलणे आवश्यक आहे