राष्ट्रीय बालिका दिना निमित्त आज(रविवार) हरिद्वार येथील सृष्टी गोस्वामी हिला उत्तराखंडचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळाली होती. यावेळी, सृष्टीने राज्य सरकारकडून राबवल्या जात असलेल्या विविध योजानांचा अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला.
देशभरात महिला व बालविकास मंत्रालयाच्या पुढाकाराने दरवर्षी २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.
हरिद्वार जिल्ह्यातील बहादराबाद विकासखंडच्या दौलतपुर गावातील असलेली सृष्टी गोस्वामी २०१८ मध्ये बाल विधानसभेत बाल आमदार म्हणून देखील गेलेली आहे. तसेच, २०१९ मध्ये सृष्टीने गर्ल्स इंटरनॅशनल लीडरशीपसाठी थायलंडमध्ये भारताचे नेतृत्व देखील केलेले आहे. मागील दोन वर्षांपासून सृष्टी ‘आरंभ’ ही योजना चालवत आहे. यामध्ये परिसरातील गरीब मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं व त्यांना मोफत पाठ्यपुस्तक पुरवण्याचं काम केलं जातं.
सृष्टी रुडकी येथील बीएसएम पीजी महाविद्यालयाची बीएससी अॅग्रीकल्चरची विद्यार्थीनी आहे. तिचे वडील प्रवीण पुरी हे गावात किराणा दुकान चालवतात. तर आई सुधा गोस्वामी या अंगणवाडी कार्यकर्ता आहेत. छोटा भाऊ श्रेष्ठ पुरू इयत्ता अकारावीचा विद्यार्थी आहे. सृष्टीचा सर्व गावाला अभिमान आहे, असं तिच्या वडिलांना म्हटलं आहे.
“राष्ट्रीय बालिका दिन निमित्त सर्व मुलींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आमचे सरकार सर्व मुलींना स्वावलंबी आणि त्यांच्या सबलीकरणासाठी दृढ आहे.” असं उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी ट्वटि केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 24, 2021 7:09 pm