स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिला छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यावरुन थेट बलात्काराची धमकी देणाऱ्या इन्स्टाग्रामवरील शुभम मिश्रा या तरुणाला वडोदरा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वत:च तक्रार दाखल करुन घेत मिश्राला ताब्यात घेतलं आहे. यासंदर्भातील माहिती पोलिसांनी ट्विटवरुन दिली आहे.

वडोदरा पोलिसांच्या अधिकृत अकाउंटवरुन शुभमच्या अटकेसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. “वडोदरा शहर पोलिसांनी सु मोटो पद्धतीने तक्रार दाखल करुन घेत अपमानजनक, धमकी देणारी व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड करुन शेअर करणाऱ्या शुभम मिश्राला अटक केली आहे. आम्ही त्याला अटक केली असून एफआयआर दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे. भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात येईल,” असं पोलिसांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

एका स्टँडअप व्हिडिओमध्ये कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी  शनिवारी जाहीर माफी मागितली. एका स्टँडअप शोदरम्यान जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जोशुआचा हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला त्यानंतर तीने समोर येत याप्रकरणी ट्विटवरुन माफी मागितली. मात्र रविवारी या प्रकरणाने एक नवं वळणं घेतलं. जोशुआला विरोध करताना शुभमने एक व्हिडिओ पोस्ट करुन थेट तिला बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भातील ट्विट अभिनेत्री स्वरा भास्करने केलं होतं.

स्वरा भास्करने केली होती विनंती

स्वराने तिने काही ट्विट करुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबरच शुभम हा गुजरातचा असल्याची शक्यता असल्याने गुजरात पोलिसांनाही त्याच्यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. “सर इन्स्टाग्राम इनफ्ल्यूएन्सर असणाऱ्या शुभम मिश्रा याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अग्रिमा जोशुआला बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. तसेच त्याने इतरांनाही असं करण्यास सांगितलं आहे. महाराष्ट्रात राहणारी एक महिला म्हणून अशाप्रकारे बलात्काराची धमकी देणारे मोकाट फिरत असल्याने माला भिती वाटत आहे. यासंदर्भात काहीतरी करा,” असं ट्विट स्वराने देशमुख यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्याची विनंती ट्विटवरुन केली होती.

शुभमने पोस्ट केलेला व्हिडिओही स्वराने ट्विट केला होता. या व्हिडिओमध्ये शुभम अत्यंत अश्लील भाषेत जोशुआबद्दल बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ ट्विट करताना स्वराने अनिल देशमुख यांना टॅग केलं होतं. “माननीय अनिल देशमुख सर एखादा अपमानास्पद विनोद केला म्हणून थेट सार्वजनिकरित्या एखाद्या महिलेला अशी धमकी देणं योग्य आहे का? हा शुभम मिश्रा उघडपणे बलात्काराची धमकी देऊन इतरांनाही तसं करण्यास सांगत आहे. हा आयपीसी कलम ५०३ अंतर्गत गुन्हा आहे. तुम्ही या प्रकरणात मुंबई पोलिसांना करावाई करण्याचे आदेश द्याल का?” असं स्वराने हा व्हिडिओ ट्विट करताना म्हटलं होतं.

नक्की वाचा >> छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणाली होती स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ

शुभमने मागितली माफी…

हे प्रकरण तापल्यानंतर शुभमने माफी मागितली होती. “माझ्या मागील व्हिडिओमध्ये बलात्काराची धमकी देण्याचा माझा उद्देश नव्हता. मात्र काही लोकांना असं वाटल्याने मी तो व्हिडिओ डिलीट केला आहे,” असं शुभमने इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं होतं.

मात्र यावरुनही स्वराने त्याला सुनावताना “बालात्काराची धमकी देण्याचा हेतू नव्हता तर अगदी सविस्तरपणे बलात्कार करण्यासंदर्भातील वक्तव्य का केलं?” असा प्रश्न विचारला होता. या देशातील महिला म्हणजे थुंकण्याची जागा नाहीय मनात आलं तेव्हा थुंकला आणि निघून गेला असा टोलाही स्वराने लगावला होता. यासंदर्भातील काही हॅशटॅगही व्हायरल होत होते. या सर्व गोंधळानंतर अखेर पोलिसांनी शुभमला अटक केली आहे. या अटकेनंतर स्वरा भास्करने वडोदरा पोलिसांचे आभार मानले आहेत.