तब्बल सहा दिवसांच्या प्रयत्नानंतर बर्फाच्या ढिगाऱ्याखालून सुखरूपणे बाहेर काढण्यात आलेल्या  हणमंत आप्पा कोप्पड या जवानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लष्करी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. नरेंद्र मोदी यावेळी सुरक्षेचा नेहमीचा फौजफाटा बाजुला ठेवत रूग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी डॉक्टरांशी भेटून  लान्स नायक हणमंत आप्पा कोप्पड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार हणमंत आप्पा कोप्पड यांच्या प्रकृतीत  सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. सियाचीन ग्लेशियरमध्ये ३ फेब्रुवारीला हिमस्खलनामुळे १९ मद्रास बटालियनचे दहा जवान ढिगाऱ्याखाली सापडले होते. हिमस्खलन झालेल्या ठिकाणी तब्बल २५ फूट बर्फ कापून काढल्यानंतर हणमंत आप्पा कोप्पड यांना जिवंत बाहेर काढण्यात आले, तर याठिकाणी पाच जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती लेफ्टनंट जनरल डी एस हुडा यांनी दिली होती. हणमंत आप्पा यांना बर्फातून बाहेर काढल्यानंतर त्यांना प्रथम सियाचीन ग्लेशियर येथील लष्कराच्या बेस कॅम्पवर नेण्यात आले. त्यानंतर एअर अॅम्ब्युलन्सने त्यांना दिल्लीतील लष्करी रूग्णालयात आणण्यात आले.