गोव्यात रविवारपासून सुरू होणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अनुपस्थित राहिले. आजारी असल्याचे कारण सांगत अडवाणी गैरहजर राहिले. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून पुढे करण्यास अडवाणींचा विरोध आहे. त्याच कारणावरून अडवाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला गैरहजर राहिल्याची चर्चा सुरू झाली.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पक्षाच्या प्रचार समितीचे प्रमुख करायला अडवाणींचा विरोध असल्याचे सांगितले जात आहे. प्रकृती उत्तम असल्यास ८५ वर्षीय अडवाणी कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावण्याची शक्यता आहे. भाजपने मात्र अडवाणींच्या अनुपस्थितीवर सारवासारव केली आहे. अडवाणी यांना प्रकृतीच्या कारणावरून आपणच उपस्थित राहू नका, असे सांगितल्याचे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. अडवाणी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला शनिवारी येतील, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांना प्रचार समितीचे प्रमुख करावे, असा आग्रह काही पदाधिकारी धरण्याची शक्यता आहे. मात्र या मुद्दय़ावर वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत होण्यात अडचणी आहेत.  गोव्याच्या कार्यकारिणीतून पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह कार्यकर्त्यांना काही ठोस संदेश देतील, अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने ते नेत्यांशी विचारविनिमय करत आहेत. मोदींना प्रचारप्रमुख म्हणून जाहीर करणार काय, याविषयी प्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांना विचारले असता अजून ठोस असे काहीच ठरलेले नाही, असे मोघम उत्तर त्यांनी दिले.