21 January 2019

News Flash

सिद्धरामय्या मंत्रीमंडळातील १० मंत्री पराभूत

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सिद्धरामय्या मंत्रिमंडळातील १० मंत्री विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

बंगळूरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सिद्धरामय्या मंत्रिमंडळातील १० मंत्री विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. तर काही मंत्री थोडय़ाशा फरकाने विजय मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. सिद्धरामय्या स्वत: चामुंडेश्वरी मतदारसंघात ३६,०४२ मतफरकाने पराभूत झाले. जनता दलाच्या जी.टी. देवेगौडा यांनी या मतदारसंघात विजय मिळविला. सिद्धरामय्या यांनी बदामी मतदारसंघात विजय मिळविला. बंतवाल मतदारसंघात रामनाथ राय (८१,८३१ मते) यांना भाजपच्या यू. राजेश नाईक (९७,८०२ मते) यांनी पराभूत केले.

खाण आणि भूगर्भमंत्री विनय कुलकर्णी (६४,७८३ मते) धारवाड मतदारसंघातून पराभूत झाले. भाजपच्या अमृत देसाई (८५,१२३ मते) यांनी त्यांना पराभूत केले. गदग मतदारसंघातून के.एच. पाटील पिछाडीवर होते. मात्र, अखेर त्यांनी केवळ दोन हजार मतफरकाने निसटता विजय मिळविला. तर हल्याळ मतदारसंघात आर.व्ही. देशपांडे यांनीही पिछाडीवरून निसटता विजय मिळविला.  सामाजिक विकासमंत्री एच. अंजनेया (६९,०३६ मते) होल्केरी मतदारसंघात पराभूत झाले. महिला विकास आणि बालकल्याणमंत्री उमाश्री (६६,३२४ मते) यांना तेरडल मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला.

सार्वजनिक बांधकाममंत्री एच.सी. महादेवप्पा, साखरमंत्री मोहन कुमारी, डॉ. प्रकाश पाटील (सेदाम), एस.एस. मल्लिकार्जुन (दावनगेरे), कागोडू थिमाप्पा (सागरा), बसवराज रायरेड्डी (येलबुर्गा) या मंत्र्यांनाही पराभव पत्करावा लागला.

First Published on May 16, 2018 1:24 am

Web Title: siddaramaiah 10 cabinet ministers defeat in karnataka polls