‘स्वच्छ भारत’ अभियानाची अंमलबजावणी करणाऱ्या कृती दलाचे निमंत्रक व्हावे, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडे व्यक्त केली होती, मात्र आपण त्यास नकार दिला, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी येथे सांगितले. आपण या अभियानाचे केवळ सदस्य राहू, असे सिद्धरामय्या यांनी मोदी यांना सांगितले. मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची पहिली बैठक झाली त्यामध्ये तीन उप-गट तयार करण्यात आले होते. केंद्र पुरस्कृत योजनांच्या उप-गटाचे अध्यक्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना करण्यात आले होते. कौशल्य विकासाची जबाबदारी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्यावर तर स्वच्छ भारतची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली होती असे सिद्धरामय्या म्हणाले. प्रत्येक उप-गटात १०-११ मुख्यमंत्री आहेत.तथापि, आपल्याकडे या कामासाठी वेळ नसल्याने अन्य कोणावर ही जबाबदारी सोपवावी, अशी विनंती आपण पंतप्रधानांना केल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले.