पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट असताना माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तान बरोबर चर्चेनेच प्रश्न सुटू शकतो असे मत मांडले. त्यामुळे त्यांच्यावर चौफर टीका सुरु असून त्यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सोमवारी सकाळी पंजाब विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या आमदारांनी त्यांना प्रखर विरोध केला.

त्यामुळे सिद्धू यांचा पारा चढला व अकाली दलाचे आमदार बिक्रम सिंग मजिठिया यांच्याबरोबर त्यांची शाब्दीक वादावादीही झाली. सिद्धू यांना मंत्रीपदावरुन हटवण्यात यावे अशी अकाली दलाच्या आमदारांची मागणी आहे. सिद्धू यांची कपिल शर्माच्या शो मधूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. पंजाब विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी मजिठिया यांच्या नेतृत्वाखाली अकाली नेत्यांनी सिद्धू यांच्या पाकिस्तान भेटीचे फोटो जाळले.

पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची गळाभेट घेतानाचे हे फोटो होते. विधानसभेत मजिठिया आणि अन्य आमदारांनी सिद्धू यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली व फोटो झळकवून दाखवले. हातावर काळी फित बांधून आलेले हे आमदार सिद्धू बोलत असतानाही घोषणाबाजी करत होते. सिद्धू आणि मजिठिया यांच्यात शाब्दीक वादही रंगला होता. मागच्या वर्षी इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळयासाठी सिद्धू पाहुणे म्हणून पाकिस्तानला गेले होते. या संपूर्ण वादावर आम्हाला काँग्रेस आणि पंजाब सरकारची काय स्पष्ट भूमिका आहे ते समजले पाहिजे. ते पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा निषेध करणार का ? असा सवाल मजिठिया यांनी पत्रकारांशी बोलताना विचारला. सभागृहात एकमताने पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला.