बलात्कार व खून अशा दुहेरी गुन्ह्याबद्दल मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद असणाऱ्या वटहुकुमावर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी रविवारी सही केल्याने आता हा तरतूद अमलात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन दिवसांपूर्वीच या वटहुकुमाला मंजुरी दिली होती. गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, फौजदारी कायदा वटहुकूम २०१३ ला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. महिलांविरोधातील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनास तीन आठवडय़ांचा
अवधी असताना हा वटहुकूम संमत करण्यात आला आहे. माजी सरन्यायाधीश जे.एस. वर्मा यांच्या समितीने केलेल्या शिफारशींआधारे या वटहुकुमातील तरतुदी करण्यात आल्या आहेत. लैंगिक गुन्ह्यांची व्याख्या व्यापक करण्यासाठी बलात्काराऐवजी ‘लैंगिक हल्ला’ हा शब्द वापरण्याची शिफारस समितीने केली आहे.