जगभरात खळबळ उडवून दिलेल्या पनामा पेपर्स प्रकरणामुळे बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना ‘अतुल्य भारत’चे ब्रँड अॅम्बेसिडर बनविण्याचा निर्णय केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाने टाळल्याचे सांगण्यात येत आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या माहितीवरून याबाबतचे वृत्त दिले आहे.

जागतिक शोधपत्रकारितेच्या इतिहासात सर्वात मोठे ठरावे असे ‘पनामा पेपर्स’ प्रकरण जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने भारतातील ‘द इंडियन एक्स्प्रेस’सह जगातील अनेक नामांकित माध्यमसमूहांनी उजेडात आणले होते. आपली मालमत्ता लपविण्यासाठी, कर चुकवण्यासाठी आणि अन्य लाभांसाठी पनामा येथे कंपन्या स्थापन केलेल्या कंपन्यांशी निगडीत ५०० भारतीयांची नावे समोर आली होती. यात प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्याची सून ऐश्वर्या राय बच्चनचेही नाव पुढे आले होते. त्यामुळेच सरकारने सावध भूमिका घेत अमिताभ यांना अत्युल्य भारतचे ब्रँड अॅम्बेसिडर बलविण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. यामुळे पुढील कालावधीसाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही अतुल्य भारतची एकमेव ब्रँड अॅम्बेसिडर असेल.

दरम्यान, पनामा पेपर्स प्रकरणात पुढे आलेल्या तब्बल ५०० भारतीयांची नावे पुढे आल्याने केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन चौकशीत निर्दोष आढळल्यानंतरच अतुल्य भारतसाठी त्यांच्या नावाचा फेरविचार केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.