भारत व चीन यांच्यात पूर्व लडाखच्या सीमेवर गेल्या सहा महिन्यांपासूनच्या तणावाचा तिढा सुटण्याच्या बेतात असल्याची चिन्हे आहेत. सर्व संघर्षस्थळांवरून ठरावीक मुदतीत सैन्यमाघारी आणि शस्त्रे परत घेण्यासाठी तीन टप्प्यांमधील प्रक्रियेबाबत दोन्ही बाजूंची सर्वसाधारण सहमती झाली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली.
या प्रस्तावातील ठळक बाबींमध्ये, करार झाल्यापासून एक दिवसाच्या आत सैनिकांची वाहतूक करणारी वाहने हटवणे, पँगाँग तळ्याच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यांवरील ठरावीक भागांतून फौजा माघारी घेणे, तसेच दोन्ही बाजूंच्या सैन्यमाघारीची पडताळणी करणे यांचा समावेश आहे.
सैन्याची माघार आणि एप्रिलमध्ये होती तशी ‘जैसे थे’ परिस्थिती पुन्हा बहाल करणे याबाबतच्या प्रस्तावाला ६ नोव्हेंबरला भारतीय व चिनी सैन्यात चुशुल येथे झालेल्या उच्चस्तरीय लष्करी चर्चेच्या आठव्या फेरीत अंतिम रूप देण्यात आले.
दोन्ही बाजूंनी जे प्रस्ताव मान्य केले आहेत, त्याबाबत कॉर्प्स कमांडर्सच्या पुढील चर्चेत करारावर स्वाक्षरी करण्याची भारतीय लष्कर आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी यांची तयारी असल्याचेही सूत्रांनी सांगितले. लष्करी चर्चेची नववी फेरी येत्या काही दिवसांतच होण्याची शक्यता आहे.
भारत-चीन यांच्यातील तिढा सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्यामुळे, भारतीय लष्कराचे सुमारे ५० हजार जवान पूर्व लडाखमधील पर्वतीय भागांत अनेक ठिकाणी युद्धसज्ज ठेवण्यात आले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2020 12:22 am