गेल्या काही तासांपासून चेन्नईमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मदतकार्याला वेग आला असून, शहराच्या विविध भागांत साठलेले पाणीही ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तरीही अद्याप चेन्नई आणि आसपासच्या परिसरातील जनजीवन विस्कळीतच असून, वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी लष्कर आणि एनडीआरएफच्या जवानांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
चेन्नई आणि परिसरात शुक्रवारी पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे चेंबरापक्कम, पाँडी, पुझल या तलावांमधून होणारा विसर्ग कमी झाला आहे. अड्यार आणि कुंभ या दोन्ही नद्यांच्या पातळीतही घट झाली असून, शहरातील पाणीही ओसरू लागले आहे. त्यामुळे कालपर्यंत ज्या मार्गांवरील रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. त्यापैकी काही ठिकाणी शुक्रवारी मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
लष्कर आणि एनडीआरएफकडून सुरू असलेल्या मदतकार्याला आणखी वेग आला असून, ज्या भागांमध्ये अद्याप पाण्याची पातळी कमी झालेली नाही, तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी सुमारे १०० बोटींचा वापर करण्यात येतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारीच चेन्नई आणि लगतच्या परिसराची हवाई पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने १००० कोटी रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत जाहीर केली होती.
१४ अत्यवस्थ रुग्णांचा मृत्यू
पाणी साठल्यामुळे बंद करण्यात आलेला वीजपुरवठा आणि त्यातच रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठाही संपल्यामुळे चेन्नईतील एमआयओटी रुग्णालयातील १४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले. या संदर्भात राज्याचे आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन म्हणाले, एमआयओटी रुग्णालायत मृत पावलेले रुग्ण अत्यवस्थ होते. रुग्णालयातील इतर रुग्णांना आम्ही इतरत्र हलविले आहे. सुमारे २०० रुग्णांना घरीही पाठविण्यात आले आहे. मृत रुग्णांना रोयापेट्टा सरकारी रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले आहे.
अमेरिकेची मदतीची तयारी
चेन्नईतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अमेरिकाही पुढे आली आहे. चेन्नईतील लोकांच्या पाठिशी आपण उभे असून, भारत सरकार सांगेल ती मदत करण्यास आम्ही तयार आहोत, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे उपप्रवक्ते मार्क टोनर यांनी पत्रकारांना सांगितले. या आपत्तीमध्ये ज्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावले आहे. त्यांच्या दुःखात आम्हीही सहभागी असून, मृतांना आम्ही श्रद्धांजली वाहात आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या अवघड प्रसंगी चेन्नईतील लोकांना आपण काय मदत करू शकतो, यासाठी आम्ही भारत सरकारशी चर्चाही करतो आहोत, असे त्यांनी सांगितले.