पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते क्वाड देशांच्या परिषदेला उपस्थिती लावणार असून त्यासोबतच संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेला देखील ते उपस्थिती लावणार आहेत. मात्र, पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यामध्ये त्यांना रात्री सुखाची झोप लागू देणार नाही, असा इशारा खलिस्तानी विचारधारेच्या सिख फॉर जस्टीस या संघटनेनं दिला आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधानांच्या व्हाईट हाऊस भेटीदरम्यान व्हाईट हाऊससमोर जोरदार प्रदर्शन करण्याची योजना सिख फॉर जस्टिस (SFJ) नं आखली आहे. भारतात शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांविरोधात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलं जाईल, असं संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

क्वाड देशांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष बैठक

भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान हे चार देश सदस्य असलेल्या क्वाड गटाची ही पहिलीच प्रत्यक्ष परिषद होत आहे. याआधी करोनामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच ही परिषद घेतली जात होती. या परिषदेसाठी पंतप्रधान अमेरिकेला जाणार असल्याचं समजताच स्थानिक पातळीवर त्यांना विरोध करण्यासाठी आणि आपला निषेध करण्यासाठी SFJ नं मोदींना रात्रीची झोप लागू देणार नाही, असा इशारा दिला आहे. १० जुलै २०१९ रोजी भारतानं बेकायदेशीर कृत्यांसाठी कारवाई करत एसएफजेवर बंदी घातली आहे.

जो बायडेन परिषदेचे अध्यक्ष

२४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड गटाच्या परिषदेाल वॉशिंग्टनमध्ये हजर राहणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या परिषदेचे अध्यक्ष असतील. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा हे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभा बैठकीस मोदींसह १०० नेते उपस्थित राहणार

सिख फॉर जस्टिस आता निष्प्रभ?

दरम्यान, अमेरिकन सुरक्षा एजन्सीच्या हवाल्याने इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, सिख फॉर जस्टिस ही संघटना आता निष्प्रभ अवस्थेत आहे. त्यांनी खोटा प्रचार करण्यासाठी अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवले आहेत. या ग्रुपमध्ये अनेक नंबर हे पाकिस्तानी आणि त्यातही बहुतेक आयएसआय एजंटचे आहेत. अमेरिकेतही त्यांना आंदोलन करण्यासाठी लोक जमवावे लागत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या संघटनेकडून डार्क वेबवर प्रचार करण्यासाठी वेबसाईट्स सुरू केल्या जात आहेत. त्यावर आक्षेपार्ह मजकूर देखील टाकला जात आहे. मात्र, या वेबसाईट तज्ज्ञांना दिसताक्षणीच त्या बंद केल्या जात आहेत. परदेशात नागरिकत्व मिळवून देण्याचं किंवा पैशांचं आमिष दाखवून ते शेतकऱ्यांना सोबत येण्याचं आवाहन करत आहेत.