अमेरिकेतील शीख आणि पटेल समुदायाच्या नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेतील सर्वसमावेशक विकासाच्या मुद्द्यावरील भाषणानंतर याठिकाणी जोरदार निदर्शने केली. पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या अत्याचारांच्याविरोधात आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात तब्बल २०० जणांच्या शीख समुदायाकडून ही निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शकांनी मोदी आणि भारतविरोधी घोषणा देत संयुक्त राष्ट्रसंघाने या प्रश्नात लक्ष घालावे, अशी मागणी केली. तर, गुजरातमध्ये पाटीदार समाजाला ओबीसींचा दर्जा मिळावा या मागणीसाठी पटेल समाजाने यापूर्वीच इशारा दिल्याप्रमाणे मोदींविरोधात आंदोलन केले. आम्हाला गुजरातमध्ये पोलिसांकडून सुरू असलेल्या दडपशाहीविरुद्ध न्याय हवा आहे. गुजरातमध्ये पोलिसांकडून निष्पाप लोकांवर अन्याय केला जात आहे. मात्र, आत्तापर्यंत अशा पोलीस अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे अनिल पटेल यांनी सांगितले. यावेळी निदर्शकांनी सरदार पटेल यांचे छायाचित्र असलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या.