रिलायन्स ग्रुपमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची ‘लाट’ सुरूच असून आता अमेरिकेची खासगी इक्विटी कंपनी सिल्वर लेकने जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये अजून 4,546 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्या महिन्यातच 3 मे रोजी सिल्वर लेकने जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 5,656 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर आता पुन्हा सिल्वर लेकने जिओमध्ये अतिरिक्त 4,546 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचं जाहीर केलं आहे.

4,546 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे सिल्वर लेक जिओमध्ये अतिरिक्त 0.93 टक्के हिस्सेदारी खरेदी करेल. यापूर्वी 3 मे रोजी केलेल्या 5,656 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे कंपनीकडे जिओची 1.15 टक्के हिस्सेदारी होती. आता एकूण 10,202.55 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह सिल्वर लेककडे जिओची हिस्सेदारी 1.15 टक्क्यांहून वाढून 2.08 टक्के झाली आहे. शुक्रवारी सिल्वर लेककडून या गुंतवणूकीबाबत माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे शुक्रवारीच अबू धाबीच्या ‘मुबादला इन्व्हेस्‍टमेंट कंपनी’नेही जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 9,093.60 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीद्वारे ‘मुबादला इन्व्हेस्‍टमेंट कंपनी’ने जिओमध्ये 1.85 टक्के हिस्सेदारी खरेदी केली.

सिल्वर लेक फर्मची जगातील मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांसोबत भागीदारीचा शानदार रेकॉर्ड राहिलाय. टेक्नॉलॉजी आणि फायनान्समध्ये सिल्वर लेक कंपनी लोकप्रिय आहे. सिल्वर लेक टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बाबतीत ग्लोबल लीडर आहे. यापूर्वी सिल्वर लेकने अलीबाबा ग्रुप, एअरबीएनबी, डेल टेक्नॉलॉजी, अँट फायनान्शियल , अल्फाबेट व्हॅरिली आणि ट्विटर यांसारख्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे. यासोबतच गेल्या सहा आठवड्यांमधला हा जिओचा सातवा मोठा करार ठरला. या गुंतवणुकीसह गेल्या सहा आठवड्यांमध्ये कंपनीत जगातील विविध आघाडीच्या कंपन्यांकडून एकूण 92,202.15 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यापूर्वी जिओ प्‍लॅटफॉर्म्‍समध्ये सिल्‍वर लेकव्यतिरिक्त फेसबुक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक, केकेआर आणि मुबादला या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.