News Flash

जिओची सिम कार्ड जाळत, रिलायन्सच्या पेट्रोल पंपांवर बहिष्कार टाकत पंजाबमधील शेतकऱ्यांचं आंदोलन

पंजाबमधील सेलिब्रिटींनीही या आंदोलनाला दिला आहे पाठिंबा

प्रातिनिधिक फोटो

देशामध्ये राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या तिन्ही कृषी विधेयकांवर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे कृषी क्षेत्रातील बदलांचे कायदे प्रत्यक्षात अस्तित्वात आले. मात्र या कायद्यांविरोधात अजूनही देशातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची आंदोलने सुरु आहेत. खास करुन पंजाब आणि हरयाणामध्ये शेतकऱ्यांनी आठवडाभरापासून सुरु असलेली आंदोलने अद्याप सुरु ठेवली आहेत. अमृतसह येथे गुरुवारी अशाच एका शेतकरी आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी ‘सिम सत्याग्रहा’ची घोषणा केली. या शेतकऱ्यांनी रिलायन्स जिओची सिमकार्ड तोडून आंदोलन केलं. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

सोशल मिडियावरुन रिलायन्सच्या जिओ सिम कार्डला नष्ट करणाऱ्या या ‘सिम सत्याग्रहा’ची सुरुवात झाली. पंजाबमधील काही गायकांनीही या शेतकरीविरोधी कायद्याचा निषेध करण्यासाठी जिओचे मोबाईल सिम तोडल्याचे दिसून आलं. शेतकऱ्यांच्या या सिम सत्याग्रहाला पंजाबमधील सेलिब्रिटींचाही पाठिंबा असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक पंजाबी गायक पुढे असून त्यांनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आहे. या सेलिब्रिटींनी समन्वय समितीची स्थापना केली असून या माध्यमातून ते आंदोलनात सहभागी होत आहेत. काही सेलिब्रिटींनी तर रिलायन्सच्या पेट्रोल पंपावरुन इंधन भरु नये असं आवाहनही आपल्या चाहत्यांना केलं आहे. कृषी कायद्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मदींचे सरकार अंबानी आणि अदानींच्या काही खासगी कंपन्यांना अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा आंदोलकांकडून केला जात आहे. यालाचा विरोध करण्यासाठी आंदोलकांनी आता रिलायन्सला विरोध करण्यास सुरुवात केलीय. किसान युनियने अध्यक्ष मनजित सिंग राय यांनी, “मोठ्या कंपन्यांचा उल्लेख नसलेलं आमचं एकही भाषण नाहीय. आम्ही आता रिलायन्सचे सिमकार्ड वापरु नका असं आवाहन करत आहोत. रिलायन्सच्या पेट्रोल पंपांवरही जाऊ नका असंही आम्ही सांगत आहोत. आंदोलनातील शेतकऱ्यांनी अनेक मोठ्या कंपन्यांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे,” असं सांगितलं.

नक्की पाहा >> Video : शेतकऱ्यांनी कृषी विधेयकांबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देताना भाजपा खासदाराने काढला पळ

सरकारचे म्हणणे काय?

शेती क्षेत्रातील नव्या कायद्यामुळे शेतकऱ्याला शेतमाल देशभरात कुठेही विकण्याची मुभा मिळाली आहे. आतापर्यंत शेतमाल कृषी बाजारात विकण्याचे शेतकऱ्यावर बंधन होते. या कायद्यामुळे कृषी बाजार आणि अडते-दलालांची एकाधिकारशाही संपुष्टात येईल, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. तसेच, कंत्राटी शेती करण्यासही अधिकृत परवानगी मिळाली असून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकेल, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

विरोधकांचे म्हणणे काय?

दुसरीकडे या बदलांमुळे हमीभाव रद्द केले जातील आणि कृषी बाजारही बंद होतील, अशी भीती शेतकरी व्यक्त करत असून, हे कायदे शेतकऱ्यांविरोधात असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. केंद्राच्या कृषी धोरणाविरोधात प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांमध्ये शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसने दोन महिन्यांचे आंदोलन जाहीर केले असून, दोन कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरींचे पत्र राष्ट्रपतींना दिले जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 11:41 am

Web Title: sim satyagrah punjab farmers destroy reliance jio sim cards in protest against corporates over farm laws scsg 91
Next Stories
1 महिला सशक्तीकरणासाठी भारताचे कायदे सशक्त आणि सक्षम : स्मृती इराणी
2 हाथरस : “मुलगी करोनाने मेली असती तर नुकसानभरपाई सुद्धा नसती मिळाली”; जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे धक्कादायक वक्तव्य
3 मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण
Just Now!
X