देशाच्या उत्तरेकडील भागांत दिवसागणिक उन्हाळ्याच्या झळांची तीव्रता वाढत असून दिल्लीत शुक्रवारी ४५ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले. उष्म्याच्या तडाख्यामुळे असंख्य नागरिकांचे दैनंदिन जीवनमान कमालीचे विस्कळीत झाले आहे. अमृतसर येथे गेल्या २४ तासांत सर्वाधिक म्हणजे ४७.७ अंश सेल्सियस तापमानाची विक्रमी नोंद झाली आहे.
दिल्लीत गुरुवारी ४५.७ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आल्यानंतर या वर्षी हा उच्चांक म्हणून मानला गेला. हे तापमान साधारण तापमानापेक्षा पाच अंशांनी अधिक होते. राजधानीचे किमान तापमान २९.५ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. कमाल आणि किमान तापमानाच्या कालावधीत सापेक्ष आद्र्रता अनुक्रमे ४५ आणि २२ टक्के नोंदविण्यात आली.
दिल्लीखेरीज पंजाब आणि हरयाणाचेही अनेक भाग सध्या भाजून निघत आहेत. अमृतसर येथे सर्वाधिक म्हणजे ४७.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याचे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हिस्सार येथेही ४७.३ तर चंदिगढ येथे ४३ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले. राजस्थानातील अनेक भागांतील कमाल तापमान ४५ अंशांच्या घरात स्थिरावले आहे तर श्रीगंगानगर येथेही कमाल तापमान ४७.४ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. हे तापमान साधारण तापमानापेक्षा पाच अंशांनी अधिक आहे. याखेरीज चुरू येथे ४६.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. कोटा, बिकानेर आणि जयपूर येथे अनुक्रमे ४५.६, ४५.५ आणि ४४.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
उत्तर प्रदेशातही कडक उन्हाळ्याबरोबरच वीज टंचाई व भारनियमनाचाही मुकाबला करावा लागत असल्यामुळे लोक संतप्त झाले आहेत. या परिस्थितीत झाडे, बगिचांचा आश्रय घेण्यावाचून पर्याय उरलेला नाही. अनेक जिल्ह्य़ांमधील नागरिकांनी आंदोलन करून आपला संताप व्यक्त केली. बांदा येथे सर्वाधिक म्हणजे ४७.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
मध्य प्रदेशातील मोरेना येथे उष्म्याच्या लाटेने गेल्या २४ तासांत १६ मोरांचा बळी घेतला. खजुराहो हे राज्यातील सर्वात गरम ठिकाण ठरले. तेथे ४७ अंश तर त्याखालोखाल ग्वाल्हेर येथे ४६.२ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले. नागपूर येथेही ४६.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.