टोराण्टो : रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याच्या लक्षणांचे त्वरेने निदान करता येणे शक्य होईल, अशी अत्यंत साधी प्रयोगशाळेतील पद्धत शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे.

कॅनडातील वैद्यकीय असोसिएशन जर्नलमध्ये ही पद्धत प्रसिद्ध झाली असून रुग्णाला घरी पाठविण्यात आल्यानंतर त्याला हृदयाशी संबंधित प्रश्नांबाबतचा कितपत धोका आहे तेही ओळखता येणे या पद्धतीमुळे शक्य होणार आहे.

रुग्णाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी-अधिक प्रमाणात आहे किंवा मृत्यू येण्याची शक्यता आहे यासाठी केवळ ट्रोपोनीनहून अधिक सोपी पद्धत आम्ही विकसित केली आहे, असे कॅनडातील मॅकमास्टर विद्यापीठातील पीटर काव्हास्क यांनी म्हटले आहे.

छातीत दुखत असलेल्या रुग्णांचा आपत्कालीन विभागात वाया जाणारा वेळ आणि रक्ताच्या अनेक चाचण्या या नव्या पद्धतीमुळे कमी होण्यास मदत होणार आहे, असे मॅकमास्टर विद्यापीठातील अण्ड्र वोर्स्टर यांनी म्हटले आहे.

छातीत दुखत असल्याची लक्षणे दिसत असलेल्या रुग्णाच्या आजाराचे निदान करण्यापूर्वी त्याच्या अनेक तास रक्ताच्या चाचण्या करण्याची गरज असते. नव्या पद्धतीच्या वापरामुळे या रक्ताच्या चाचण्यांची गरज कमी होऊ शकते. ही पद्धती पुरुष आणि स्त्रियांमध्ये सारखीच उपयुक्त आहे. त्याने हृदयविकाराचे वेळेत निदान होण्यास मदत होते. संशोधक आता या पद्धतीचा अधिक विकास करून तिचे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने या पद्धतीचा खात्रीशीरपणा आणि सुरक्षितता यांच्यात वाढ होईल.