नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेणे अत्यंत कठीण असल्याचे मत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदर कल्पना मांडली आहे. या निवडणुका कृत्रिमपणे एकत्रित घेतल्यास राज्यांना त्यांचा प्रातिनिधिक सरकारचा अधिकार नाकारला जाईल, असा युक्तिवादही मुखर्जी यांनी केला आहे.

मुखर्जी यांनी व्यक्त केलेले हे मत ते राष्ट्रपतिपदी असताना केलेल्या मताच्या विरोधी आहे. किमान दोन वेळा त्यांनी एकत्रित निवडणुकांना पसंती दर्शविली होती. शिक्षक दिनानिमित्त २०१६ मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुखर्जी म्हणाले होते की, सातत्याने निवडणुका झाल्यास त्याचा सरकारच्या नियमित कारभारावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे राजकीय पक्षांनी सामूहिकपणे निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त  केलेल्या भाषणांतही गेल्या वर्षी त्यांनी निवडणूक सुधारणांबाबत रचनात्मक चर्चा होण्याची वेळ आली असल्याचे म्हटले होते. स्वातंत्र्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्याची प्रथा सुरू करण्याबाबत वक्तव्य केले होते. डी. टी. लकडावाला स्मृती व्याख्यानात ते बोलत होते.