जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. पण १४ फेब्रुवारी २०१९ हा दिवस देशवासियांच्या कायम लक्षात राहिल. याच दिवशी काश्मीरमध्ये इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. आदिल दार या स्थानिक दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही कार सीआरपीफच्या ताफ्यातील बसवर धडकवली. यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर झालेला हा दुसरा भीषण हल्ला आहे. काश्मीर खोऱ्यात आतापर्यंत कार बॉम्बचे तीन हल्ले झाले आहेत. २००० साली आत्मघातकी हल्लेखोराने श्रीनगर विधानसभेवर कार बॉम्बने हल्ला केला होता. यात तीन दहशतवादी आणि ३८ लोकांचा मृत्यू झाला होता. २००१ साली स्थानिक दहशतवाद्याने बदामीबाग येथे स्फोटकांनी भरलेली कार लष्कराच्या ताफ्यावर धडकवली होती. हे तिन्ही हल्ले जैश-ए-मोहम्मद या संघटनेने केले आहेत.

मागच्या आठवडयात पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यावरुन या प्रदेशात २०१४ नंतर दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. २०१४ नंतर जम्मू-काश्मीरमध्ये चकमक, घुसखोरी आणि शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत नागरिक, सुरक्षा जवान आणि दहशतवादी मिळून १५०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

न्यूज १८ वेबसाइटने दक्षिण आशियातील दहशतवादाची माहिती ठेवणाऱ्या एसएटीपी संकेतस्थळाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार २०१४ ते २०१९ दरम्यान २०१८ मध्ये दहशतवादाशी संबंधित हिंसाचार सर्वोच्च पातळीला पोहोचला होता. २०१९ सालच्या पहिल्या दोन महिन्यात दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक दोन दहशतवाद्यांमागे भारताचा एक जवान शहीद झाल्याचे विश्लेषणातून समोर आले आहे. ८२ दहशतवाद्यांमागे १८ नागरीकांचा मृत्यू झाला आहे.

उपलब्ध असलेल्या डाटानुसार २०१८ मध्ये सर्वात मोठया प्रमाणावर जिवीतहानी झाली. त्यावर्षी एकूण ४५१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २७० दहशतवादी, सुरक्षा दलांचे ९५ जवान आणि ८६ नागरीक होते. २०१७ मध्ये ३५८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये २१८ दहशतवादी, सुरक्षा दलाचे ८३ जवान आणि ५७ नागरीकांचा मृत्यू झाला. काश्मीरमध्ये मानवी हक्कांसाठी काम करणारी संघटना जेकेसीसीएसच्या अहवालानुसार २०१४ नंतर दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये ५२२ च्या आसपास नागरीकांचा मृत्यू झाला आहे.