स्वातंत्र्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमुळे देशाचे विभाजन झाले. खरेतर निवडणुकांनंतर देश एकसंध व्हायला हवा होता पण तसे झाले नाही अशी टीका जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे. आपण मंदिर आणि मशिदीसाठी लढतो. पण आपण लोकांसाठी लढत नाही. राजकारणी खोटे बोलतात, कारण खरे बोललो तर आपण जिंकणार नाही याची भीती त्यांना असते.

राजकारण वाईट नाही ही बाब लक्षात घेतली पाहिजे. मात्र राजकारणाचा उपयोग कशासाठी करता हे फार महत्त्वाचे आहे. आमच्यापैकी अनेक राजकारण्यांनी समाजसेवेसाठी राजकारण करणे सुरू केले. मात्र अनेक राजकारणी असे आहेत ज्यांचा राजकारणात येण्याचा हेतू हा फक्त पैसा कमावणे आहे अशीही टीका अब्दुल्ला यांनी केली. इतकेच नाही तर प्रत्येकाने हे लक्षात घेतले पाहिजे की देव हा मंदिरांमध्ये, मशिदींमध्ये किंवा गुरुद्वारांमध्ये नसतो. देव लोकांच्या मनात असतो त्यामुळेच तुम्ही लोकांची सेवा केली तर ती गोष्ट देवाची सेवा केल्यासारखीच आहे असेही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.