देशभरात मागील चोवीस तासात ९९१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील करोनाग्रस्तांची संख्या १४ हजार ३७८ इतकी झाली आहे. कालपासून आजपर्यंत ४३ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. देशभरात आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन ४८० जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. देशभरात १९९२ रुग्ण हे बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

मागील २८ दिवसांमध्ये देशभरातल्या २३ राज्यांमधील ४७ जिल्ह्यांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहितीही अग्रवाल यांनी दिली आहे. तर देशातले ४५ जिल्हे असे आहेत ज्यामध्ये मागील १४ दिवसांमध्ये नवा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशभरात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. यावर उपाय योजण्यासाठी लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतं आहे.

करोनाशी सुरु असलेल्या असलेल्या लढाईत डॉक्टर, नर्सेस आणि इतर वैद्यकीय कर्मचारी हे एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढत आहेत. अशात त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठीही प्रयत्न होत आहेत.