आयआयटी खरगपूरच्या शास्त्रज्ञांचा दावा

सिंधू नदीच्या खोऱ्यात सुमारे ४३५० वर्षांपूर्वी पडलेल्या प्रदीर्घ दुष्काळामुळे सिंधू संस्कृती नष्ट झाल्याचा दावा खरगपूर आयआयटीच्या संशोधकांनी केला आहे. तब्बल ९०० वर्षे हा दुष्काळ होता याचे पुरावे सापडले आहेत. यामुळे याआधीच्या २०० वर्षांच्या दुष्काळाच्या सिद्धांताला छेद गेला आहे. याबाबतचा अहवाल या महिन्यातील प्रतिष्ठित अशा ऐल्सविअरच्या क्वाटरनरी इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित केला जाणार आहे.

भूगर्भशास्त्र आणि भू-भौतिकशास्त्र विभागाचे संशोधक गेल्या पाच हजार वर्षांपासून मोसमी पावसाच्या लहरीपणाचा अभ्यास करत आहेत. यावेळी असे आढळून आले, की उत्तर-पश्चिम हिमालयामध्ये पावसाने तब्बल ९०० वर्षांपर्यंत उघडझाप केली होती. यामुळे त्या परिसरातील सर्व पाण्याचे स्रोत आटले होते. यामुळे नदी काठांवर राहणाऱ्या मनुष्यवस्तीला स्थलांतर करण्याची वेळ आली होती.

खरगपूर आयआयटीच्या संशोधकांनी लेह-लडाख येथील त्सो मोरीरी लेक भागातील गेल्या ५००० वर्षांपासूनच्या मोसमी पावसाच्या लहरीपणाचा अभ्यास केला. यामध्ये चांगला, मध्यम आणि दुष्काळी काळाचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासात असे आढळून आले, की २३५० बीसी (४३५० वर्षांपूर्वी) पासून १४५० बीसीपर्यंत मोसमी पावसाचे प्रमाण प्रचंड कमी झाले होते. यामुळे नागरी वस्तीला दुष्काळाचा सामना करावा लागला होता. त्यांना मुबलक पाऊस असलेल्या ठिकाणी स्थलांतर करावे लागले, असे प्रमुख संशोधक आणि संस्थेतील भूगर्भशास्त्राचे वरिष्ठ अधिकारी अनिल कुमार गुप्ता यांनी सांगितले. हे निर्वासित लोक हळूहळू पूर्व आणि मध्य उत्तर प्रदेशच्या दिशेने आणि पूर्वेस बिहार आणि बंगाल गंगा-यमुना खोऱ्याकडे आणि विंध्याचल, गुजरातच्या दक्षिणेकडे गेल्याचे गुप्ता यांनी सांगितले.