सिंगापूरचे संस्थापक नेते ली कुआन यू यांना  हजारो नागरिकांनी रविवारी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. त्यांच्या अंत्यविधीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगातील नेते उपस्थित होते. ‘आजच्या काळातील ते  एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते’, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.
मोदी रविवारी सकाळी सिंगापूरला आले व त्यांनी ली यू यांना श्रद्धांजली वाहिली. ली  हे बांधीलकी जपणारे कर्मयोगी होते, अशी प्रतिक्रिया मोदी यांनी व्यक्त केली.
सिंगापूरच्या राष्ट्रध्वजात गुंडाळून त्यांचा पार्थिवदेह १५.४ कि.मी. लांब मार्गावरून नेण्यात आला. त्यांचे पार्थिव काचेच्या पेटीत ठेवलेले होते.  संसदेत त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला, त्या वेळी साडेचार लाख लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, ली यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने रविवारी एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला होता.