सिंगापूरचे संस्थापक व प्रथम पंतप्रधान ली कुआन यू (९१) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सिंगापूरला ब्रिटिशांच्या वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त करून आंतरराष्ट्रीय व्यापार व आर्थिक केंद्र म्हणून नावारूपास आणण्यात यू यांचा सिंहाचा वाटा होता. गेल्या महिन्यापासून ते येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या निधनामुळे सिंगापूरमध्ये सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून २९ मार्च रोजी यू यांच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात येतील.
यू यांच्या निधनाची वार्ता सोमवारी पहाटे प्रसारित करण्यात आली. जगभरातील नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांचे वर्णन इतिहासातील खरा महापुरुष असा केला असून संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी त्यांना आशियातील महान व्यक्तिमत्त्व असे म्हटले आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी ली यांचे चीनचा जुना मित्र असे वर्णन केले. गेली ३१ वर्ष ली हे पंतप्रधान होते व त्यांच्यामुळेच सिंगापूरची भरभराट झाली. यू केम्ब्रिजमध्ये शिकलेले वकील होते व माध्यम स्वातंत्र्याच्या मुद्दय़ावरून त्यांच्यावर टीका झाली होती. त्यांचा जन्म सिंगापूर हा जमिनीचा छोटा तुकडा असताना म्हणजे १९२३ मध्ये झाला. त्या वेळी देशाकडे नैसर्गिक साधनसंपत्ती नव्हती व चिनी, मलेशियन व भारतीय लोक तेथे होते. अनेकदा दंगलींमुळे अशांतता असायची. १९६५ मध्ये ते मलेशियापासून वेगळे निघाले.