सिंगापूरमधील वाचनालयांना दिशा देणाऱ्या, तेथील ग्रंथालय वापरकर्त्यांना अधिक मुक्तता देणाऱ्या भारतीय वंशाच्या ग्रंथपालांचा सिंगापूरमध्ये सन्मान करण्यात आला. या सत्तर वर्षीय ग्रंथपालांचे नाव रसू रामचंद्रन असे असून एकूण ग्रंथालय व्यवसायातील त्यांच्या र्सवकष योगदानालाच यानिमित्ताने सन्मानित करण्यात आले.
सिंगापूरचे अध्यक्ष टोनी टॅन यांच्या हस्ते रविवारी एका सोहळ्यात रामचंद्रन यांना सन्मानित करण्यात आले. १९६९ साली ग्रंथपाल म्हणून रुजू झालेल्या रामचंद्रन यांनी राष्ट्रीय ग्रंथालय मंडळ कायद्याच्या निर्मितीत भरीव योगदान दिले होते. १९९५ मध्ये संमत झालेल्या या कायद्यामुळे ग्रंथालयांच्या कामकाजात अधिक लवचीकता तर आलीच, पण त्याबरोबर त्यांचा अधिक मुक्तपणे विस्तार करणेही शक्य झाले.
‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन्स अँड इन्स्टिटय़ूशन्स’च्या जागतिक ग्रंथालय आणि माहिती सभेचे ७९ वे अधिवेशन सिंगापूरमध्ये भरले आहे. यात हा सन्मान करण्यात आला.
सहभागाचाच आनंद
ग्रंथालये हा सिंगापूरवासीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याच्या प्रक्रियेत मला सहभागी होता आले, याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया रामचंद्रन यांनी सन्मान स्वीकारताना व्यक्त केली.