ख्रिश्चन आणि ज्यू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सिंगापूर न्यायालयाने एका भारतीय इमामाला सिंगापूर सोडण्याचे आदेश दिले आहेत. नल्ला मोहम्मद अब्दुल जमील (वय ४७) असे इमामचे नाव आहे. मात्र, इमाम नल्ला मेाहम्मद अब्दुल जमीलने स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगितले आहे.
यापूर्वी अब्दुल जमीलला न्यायालयाने २,८६० डॉलरचा दंड ठोठावला होता. त्याने हा दंड भरलाही होता. तरीही त्याने वादग्रस्त वक्तव्ये करणे सोडले नव्हते. त्याने न्यायालयासमोर धार्मिक आधारावर द्वेष निर्माण करण्याचा आरोप फेटाळून आपण निर्दोष असल्याचे म्हटले होते.
फेब्रुवारीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये इमाम जमील हा ख्रिश्चन आणि ज्यूंविरोधात अल्ला आपली मदत करेल, असे म्हणत असताना दिसत आहे.
जमीलने दंड भरला आहे आणि आता त्याला त्याच्या देशात पाठवले जाईल, असे सिंगापूरच्या गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य करणारा धार्मिक नेता स्वत: याला जबाबदार असेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. त्याचबरेाबर सिंगापूरच्या कायद्यान्वये आम्ही त्याच्या धर्मासाठी इतर धर्माचा अपमान किंवा विभाजनकारी कृत्याचे समर्थन करू शकत नाही. आणि एखाद्या धर्म ग्रंथात लिहिलेल्या गोष्टी कायदेशीरही ठरवू शकत नाही, असेही म्हटले आहे. इमाम जलीलने शुक्रवारी ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि हिंदू धर्माच्या प्रतिनिंधीसमोर माफीही मागितली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 11:06 am