करोनाचा फटका न्यायव्यवस्थेलाही बसला आहे. अनेक देशांमध्ये आता न्यायलयांमधील महत्वाच्या प्रकरणांची सुनावणी व्हिडिओ कॉल आणि फोन कॉलच्या माध्यमातून केली जात आहे. सिंगापूरमध्ये अशाच एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायाधिशांनी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणामध्ये न्यायलयाने ही शिक्षा सुनावली आहे. व्हिडिओ कॉलवरुन अशाप्रकारे थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्याची पहिलीच वेळ आहे. रॉयटर्सच्या हवाल्याने गार्डीयनने हे वृत्त दिलं आहे. मूळचा मलेशियन नागरिक असणाऱ्या पी गेनासन (३७) हा २०११ च्या अंमली पदार्थाच्या तस्करीच्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सिंगापूरमध्येही करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक सार्वजनिक ठिकाणच्या सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सिंगापूरमधील सर्वोच्च न्यायलयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कालावधीमध्येही न्यायालयाचे काम सुरु रहावे म्हणून खटल्याशी संबंधित व्यक्तींनी व्हिडिओ तसेच टेलिफोनवरुन सुनावणीसाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पी गेनासनचे प्रकरण हे सर्वोच्च न्यायलयामध्ये सुनावणी झालेले पहिलेच प्रकरण आहे.  गेनासनचे वकील पीटर फर्नांडो यांनी माझ्या गेनासनला झूम कॉलवरुन फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचे म्हटलं आहे. मात्र याविरोधात आपण पुन्हा एकदा याचिका दाखल करणार असल्याचे पीटर यांनी स्पष्ट केलं आहे. पीटर यांनी व्हिडिओ कॉलवरुन याचिकेची सुनावणी करण्याच्या निर्णयाला विरोध नसल्याने म्हटले आहे. व्हिडिओ कॉलवरुन केवळ अंतिम निकाल देण्यात आला. कोणताही युक्तीवाद यामध्ये झाला नाही असं पीटर यांनी स्पष्ट केलं आहे.

सिंगापूरमध्ये सध्या न्यायलयांचे कामकाज बंद आहे. मात्र महत्वपूर्ण खटल्यांची सुनावणी व्हिडिओ कॉलवरुन करण्याची मूभा देण्यात आली आहे. १ जून पासून देशामधील न्यायलयांचे काम पुन्हा सुरु होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सिंगपूरमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी कठोर शिक्षा आहे.