‘लिटल इंडिया’ भागात अलीकडेच झालेल्या सर्वात भीषण अशा दंगलीत सहभागी झाल्याबद्दल सिंगापूरमधून ५२ भारतीयांना शुक्रवारी परत पाठविण्यात आले.
५३ जणांना त्यांच्या मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया गुरुवारी सुरू झाली. त्यामध्ये ५२ भारतीय व एका बांगलादेशी नागरिकाचा समावेश आहे. ‘लिटल इंडिया’ भागात गेल्या ८ डिसेंबर रोजी झालेल्या दंग्यात सहभागी झाल्याबद्दल अधिकाऱ्यांनी २८ भारतीयांविरोधात फौजदारी आरोप दाखल केले होते. शक्तिवेल कुरारवेलू या ३३ वर्षीय नागरिकास एका खासगी बसने धडक दिल्यामुळे तणाव उत्पन्न झाला आणि त्याचे पर्यवसान दंगलीत झाले. त्यावेळी तेथे लुटालूटही झाली.
 सुमारे ४०० जणांनी त्यात भाग घेतला. यावेळी झालेल्या हिंसाचारात ३९ पोलीस जखमी झाले होते. याखेरीज २५ वाहनांची नासधूस करण्यात आली आणि त्यामध्ये पोलिसांच्या १६ मोटारींचा समावेश होता.
भारतीयांचेच व्यवसाय
 या परिसरात प्रामुख्याने भारतीयांचे व्यवसाय असून तेथे हॉटेल, पब व अन्य खाद्य पदार्थाची दुकाने असून सिंगापूरमध्ये स्थायिक झालेले बहुतेक दक्षिण आशियाई नागरिक दर रविवारी तेथे येऊन न्याहरी करतात.या दंगलींनतर ५३ जणांना त्यांच्या मायदेशी रवाना करण्यात आले असून, त्यांना पुन्हा सिंगापूरमध्ये प्रवेश करू दिला जाणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.
सिंगापूरमध्ये याआधीही १९६९ मध्ये अशा प्रकारचा मोठा दंगा झाला होता.