भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन झाले आहे. ते ८० वर्षांचे होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

गायक दलेर मेहेंदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे नरेंद्र यांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. ‘गायक नरेंद्र चंचल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला दु:ख झाले’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

नरेंद्र यांचे बॉलिवूड करिअर हे अभिनेते ऋषि कपूर यांच्यासोबत सुरु झाले होते. त्यांनी ‘बॉबी’ चित्रपटातील ‘बेशक मंदिर मस्जिद तोडो’ हे गाणे गायले होते. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. पण त्यांना ‘अवतार’ या चित्रपटात गायिलेले ‘चलो बुलावा आया है’ या भजनाने खरी ओळख मिळवून दिली. काही दिवसांपूर्वी त्यांनी करोना व्हायरसवर देखील एक गाणे गायले होते आणि हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.