संजय बारू यांच्यानंतर आता माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांच्या पुस्तकामुळे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. मनमोहनसिंग यांना यूपीए सरकारमध्ये राजकीय अधिकार अत्यंत कमी होते, असा दावा पारख यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. संजय बारू यांनी आपल्या पुस्तकात मनमोहनसिंग सोनिया गांधींच्या आदेशानुसार काम करीत होते, अशा स्वरुपाचा दावा केला होता. गेल्या आठवड्यातच या पुस्तकामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. आता पुन्हा एकदा पारख यांच्या पुस्तकामुळे पंतप्रधान आणि कॉंग्रेसपुढील अडचणी ऐन निवडणुकीच्या काळात वाढणार आहेत.
पारख यांचे क्रुसेडर ऑर कॉन्स्पिरेटर? कोलगेट अॅंड अदर ट्रथ्स हे पुस्तक सोमवारी प्रसिद्ध होते आहे. पारख हे केंद्र सरकारच्या सेवेतून डिसेंबर २००५ रोजी स्वेच्छेने निवृत्त झाले. पदाचा राजीनामा दिल्यानंतर पारख पंतप्रधानांना भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यमध्ये झालेल्या संवादाचा उल्लेख त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे खासदार धर्मेंद्र प्रधान यांनी अपमान केल्यानंतर आणि केंद्र सरकारने त्यावर कोणतीच भूमिका न घेतल्याने पारख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बैठकीत अपमान झाल्यानंतर १७ ऑगस्ट २००५ रोजी त्यांनी पंतप्रधानांनी भेट घेतली. केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱयांना खासदारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा मुद्दा त्यांना पंतप्रधानांपुढे मांडायचा होता. यावेळी भेटीमध्ये पंतप्रधान पारख यांना म्हणाले, मलाही अशा स्वरुपाच्या अपमानास्पद वागणुकीला रोजच सामोरे जावे लागते. मात्र, अशा मुद्द्यांवरून राजीनामा दिल्यास ते देशहिताचे ठरणार नाही.
स्वतःला अत्यल्प राजकीय अधिकार असलेले सरकार चालवून मनमोहनसिंग यांची प्रतिमा खालावली आहे. त्यातच टू जी घोटाळा, कोळसा खाण वाटप घोटाळा यामुळेही त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला असल्याचे पारख यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. सीबीआयने पारख यांच्याविरोधातच कोळसा खाण वाटपप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.