दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दोन दिवसांपासून देशात ६० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६१ हजार ५३७ करोनाबाधित रुग्ण आढळे आहेत. तर गेल्या २४ तासांत ९३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख ८८ हजार ६१२ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशात आतापर्यंत १४ लाख २७ हजार ६ रुग्णांवर करोनावर मात केली आहे. सहा लाख १९ हजार ९८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ४२ हजार ५१८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी देशात पाच लाख ९८ हजार ७७८ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सात ऑगस्टपर्यंत देशात दोन कोटी ३३ लाख ८७ हजार १७१ करोना चाचण्या झाल्या आहेत.

ऑगस्ट महिन्यात भारतात आतापर्यंत करोनाचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही ही संख्या अधिक आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांमध्येच भारत करोनाबाधितांच्या सर्वाधिक रुग्णसंख्येमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ६ दिवसांमध्ये देशात ३ लाख २८ हजार ९०३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर अमेरिकेत सहा दिवसांमध्ये ३ लाख २६ हजार १११ रुग्णांची नोंद झाली. कर ब्राझीलमध्ये २ लाख ५१ हजार २६४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. २ ऑगस्ट, ३ ऑगस्ट, ५ ऑगस्ट आणि ६ ऑगस्ट रोजी जगातील सर्वाधिक रुग्णांची नोंद भारतात झाली.