एकट्या पालकाने मुलांचा सांभाळ करत त्यांना मोठे करणे या गोष्टीचा समाजावर नकारात्मक परिणामही होऊ शकतो. मुलाला आई आणि बाबा या दोघांचेही प्रेम मिळणे गरजेचे आहे. एकल पालकत्व ही संकल्पनाच समाजासाठी घातक आहे, असे निरीक्षण मद्रास हायकोर्टाने शुक्रवारी नोंदवले.

मद्रास हायकोर्टाने लहान मुलांवरील अत्याचारासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवरुन केंद्र सरकारला निर्देश दिले होते. लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणे, शाळांमध्ये जनजागृती मोहीम राबवणे असे विविध निर्देश हायकोर्टाने दिले होते. मात्र, याचे पालन न केल्याचा दावा करत याचिकार्त्यांनी कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली. या याचिकेवर शुक्रवारी न्या. किकूबाकरन यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

न्या. किकूबाकरन म्हणाले, एकत्रित कुटुंबपद्धतीवरुन आपण विभक्त कुटुंबावर पोहोचलो आणि आता एकल पालकत्वाची संकल्पना समोर येत आहे. मात्र मुलांना आई आणि वडिल दोघांचेही प्रेम मिळणे गरजेचे आहे, असे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाचे विभाजन करुन बालविकास असे स्वतंत्र मंत्रालय केले पाहिजे, असेही हायकोर्टाने नमूद केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ ऑगस्ट रोजी होणार आहे.