News Flash

अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याकडे अफगाणिस्तानचे गृहमंत्री पद; भारतीय दूतावासावर केला होता हल्ला

सिराजुद्दीनने काबूलमधील भारतीय दूतावासावर घडवून आणलेल्या हल्ल्यामध्ये भारतीयांसह ५८ जणांचा मृत्यू झाला होता

Sirajuddin haqqani interior minister Afghanistan Taliban government most wanted terrorist india
मंगळवारी काबूलमध्ये पाकिस्तानविरोधी निदर्शने करण्यात आली (फोटो सौजन्य- WANA via Reuters)

तालिबानने मंगळवारी पंजशीर खोऱ्यावर विजय मिळवल्याचा दावा केल्यानंतर काही तासांतच अफगाणिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार स्थापन झाले आहे. आधी जाहीर केलेल्या मुदतीपेक्षा दोन दिवसांच्या विलंबाने हे हंगामी सरकार स्थापन झाले असून त्याचे नेतृत्व मुल्ला हसन अखुंद करणार आहेत. या सरकारमध्ये मुल्ला बरादर हे उपप्रमुख असतील. तालिबानने मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेल्या सिराजुद्दीन हक्कानीला आता अफगाणिस्तानचे नवे गृहमंत्री बनवले आहे. हक्कानीवर अमेरिकेने बक्षीस जाहीर केले आहे.

सिराजुद्दीन हक्कानी पाकिस्तानच्या उत्तर वजीरिस्तान येथील आहे. हक्कानी नेटवर्क ही दहशतवादी संघटना चालवणारा सिराजुद्दीन हक्कानी उत्तर वजीरिस्तानच्या मीराम शाह भागात राहतो असे म्हटले जाते. हक्कानी नेटवर्कच्या या दहशतवाद्याचे नाव अजूनही एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड यादीत समाविष्ट आहे.

समजून घ्या : तालिबानी नक्की आहेत तरी कोण? आणि त्यांच्यापासून जगाला एवढा धोका का वाटतोय?

अफगाणिस्तानचे नवे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे नाव जागतिक स्तरावरील दहशतवाद्यांच्या यादीत आहे. अमेरिकेने त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला ५० लाख डॉलर्सचे (जवळपास ३६ कोटी रुपये) बक्षीस जाहीर केले आहे. अमेरिका सिराजुद्दीन हक्कानीला आपला सर्वात मोठा शत्रू मानतो. सिराजुद्दीनवर २००८ मध्ये जानेवारी महिन्यात काबूलमधील एका हॉटेलवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अमेरिकन लोकांसह सहा जण ठार झाले होते. अमेरिकेविरुद्ध अफगाणिस्तानात सीमेवरील हल्ल्यांमध्ये सिराजुद्दीनचा देखील सहभाग होता. याशिवाय, २००८ मध्ये अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या हत्येच्या कटात या सिराजुद्दीनचे नावही समोर आले होते.

जलालुद्दीन हक्कानीच्या मृत्यूनंतर मुलगा सिराजुद्दीन हक्कानी हक्कानी नेटवर्कचे नेतृत्व करत आहे. हक्कानी गट पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तालिबानच्या आर्थिक आणि लष्करी मालमत्तेवर देखरेख करतो. अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ले सुरू करणारे हक्कानीच होते असे काही तज्ज्ञांचे मत आहे. अफगाणिस्तानातील अनेक मोठ्या हल्ल्यांसाठी हक्कानी नेटवर्क जबाबदार असल्याचे मानले जाते.

दहशतवादी ते राष्ट्रप्रमुख… तालिबानने अफगाणची सत्ता ज्याच्या हाती दिली तो हसन अखुंड आहे तरी कोण?

सिराजुद्दीनने ७ जुलै २००८ रोजी काबुलमधील भारतीय दूतावासावर आत्मघाती कार बॉम्ब हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात अनेक भारतीयांसह ५८ जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला घडवण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने आदेश दिले होते. पाकिस्तानशी थेट संबंध असल्यामुळे ही दहशतवादी संघटना आता भारतासाठी मोठ्या चिंतेचे कारण बनली आहे.

रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत…; पंजशीर मिळवल्याच्या तालिबानच्या दाव्यावर अहमद मसूदची प्रतिक्रिया

पाकिस्तानची गुप्तचर संस्था हक्कानी नेटवर्कला आश्रय देत असून वेळोवेळी भारताच्या विरोधात त्याचा वापर करत आहे. पूर्व अफगाणिस्तानमध्ये हक्कानी नेटवर्कचा सर्वाधिक प्रभाव आहे. अफगाणिस्तानमध्ये प्रभावी असलेल्या या संघटनेचा आधार पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम सीमेवर आहे. या संघटनेच्या कारवाया गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढल्या आहेत. २०१५ सिराजुद्दीन हक्कानीला तालिबानचा उपनेता म्हणून घोषित करण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 7:56 am

Web Title: sirajuddin haqqani interior minister afghanistan taliban government most wanted terrorist india abn 97
Next Stories
1 तालिबान-चीन संबंधांवर जो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “चीन आणि तालिबानचे संंबंध…”
2 कर्नालमध्ये शेतकऱ्यांचा जिल्हा मुख्यालयास घेराव
3 तालिबानचे हंगामी सरकार; प्रमुखपदी मुल्ला हसन अखुंद
Just Now!
X