उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाची देशभरामध्ये चर्चा आहे. या प्रकरणामधील पीडित तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. पीडित तरुणी १४ सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेबद्दलही संक्षय व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने उत्तर प्रदेश पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. कुटुंबाच्या परवानगीनंतरच अंत्यसंस्कार कऱण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आता यावर पीडित तरुणीच्या वहिनीने धक्कादायक खुलासा केला असून आमच्या कुटुंबाऐवजी इतर व्यक्तींना तेथे उभं करुन व्हिडीओ शूट करण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या वहिनीने केला आहे.

नक्की वाचा >> “भाजपाचे सरकार इतके क्रूर कसे?, योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा”

जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये दोन जण या पीडितेवर अंत्यसंस्कार करताना दिसत आहेत. याच व्हिडिओसंदर्भात न्यूज १८ शी बोलताना त्या व्हिडीओमधील लोकं हे पीडितेचे नातेवाईक नसल्याचे सांगितलं आहे. “कोणी बघितलं तर कुटुंबातील सदस्य आहेत असं त्यांना वाटावं म्हणून इतर लोकांना तिथं आणून उभं केलं आणि व्हिडीओ शूट करण्यात आला,” असं पीडितेच्या वहिनीने म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिला पोलिसांकडून पीडितेच्या नातेवाईकांना मारहणार करण्यात आल्याचा आरोपही यावेळी या महिलेने केला आहे. “महिला पोलिसांनी आम्हाला मारहण केली. त्याच भीतीने आम्ही घरात थांबलो होतो,” असं या महिलेने म्हटलं आहे.

व्हिडीओमधील व्यक्ती या पीडितेचे वडील आणि भाऊ असल्याचा दावा केला जात असला तरी तो खोटा असल्याचेही पीडितेच्या वहिनीने सांगितलं आहे. “ते (पीडितेचे वडील) चालत जाण्याच्या परिस्थितीमध्येच नव्हते. त्यांना इथे अंगणात खाटेवर झोपवलं होतं. त्यामुळे ते तिथे गेलेचे नव्हते. त्या व्हिडीओत दिसणाऱ्या लोकांना आम्ही ओळखतही नाही. मी तो व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओमधील त्या व्यक्तींचे चेहरेही नीट दिसत नाहीयत. मात्र त्या व्यक्तींचा आमच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाहीय हे नक्की,” असं या महिलेने सांगितलं आहे.

नक्की वाचा >> ‘ओढणी गळ्यात टाकून तिला खेचत नेलं आणि…’; जाणून घ्या १४ सप्टेंबरला नक्की काय घडलं

चेहराही बघू दिला नाही…

पार्थिव घरी आणला जावा यासाठी पोलिसांकडे वारंवार विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे. पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना घरात कोंडून तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले जात आहे. पीडितेच्या वडिलांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार आम्ही या अंत्यसंस्काराला विरोध करत असतानाही तिच्यावर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. हिंदू संस्कृतीमधील परंपरेनुसार आम्हाला मुलीवर अंत्यसंस्कार करायचे होते. त्यामुळेच आम्ही दिवसा अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली होती. आमच्या सर्व नातेवाईकांनी मुलीच्या अंत्यस्कारामध्ये सहभागी होऊन तिचे अंत्यदर्शन घ्यायचे होते. मात्र आमच्या मुलीचा मृतदेह पोलीस बळजबरीने घेऊन गेले. आमच्यापैकी कोणालाही तिच्या पार्थिवाजवळ जाऊ दिले नाही. आमच्यापैकी कोणीच तिच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झालं नाही. मला माझ्या मुलीचे अंत्यदर्शनही पोलिसांनी करु दिले नाही. अंत्यसंस्काराआधी मला तिचा चेहराही पाहता आला नाही, असं मुलीचे वडील रडतच सांगत होते.