उत्तर भारतात सध्या तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. वाराणसीमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलेलं दिसत आहे. अशाच एका फोटोला रिट्विट करत कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “ही परिस्थिती आहे पंतप्रधानांच्या मतदारसंघात..आता ते वाराणसीला व्हेनिस बनवल्याचा दावा करतील”. पंतप्रधान मोदींनी क्योटोप्रमाणे आपल्या मतदारसंघाचा विकास करण्याची अनेक आश्वासने दिली होती. त्यावरुन त्यांच्यावर ही टीका होत आहे.


याआधीही काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांच्यावरुन यावर टीका केली होती. वाराणसी दौऱ्यावर आलेले उत्तरप्रदेशच्या काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू म्हणाले की, काशी क्योटो तर नाही झाली पण इथली परिस्थिती आणखी बिघडली आहे. लोक आपला जीव मुठीत धरुन घराबाहेर पडत आहेत.

नरेंद्र मोदी यांनी ज्या गावांना स्मार्ट सिटी बनवण्याचा दावा केला होता, त्यापैकी वाराणसी एक आहे. मात्र, पावसानंतर तिथली परिस्थिती फारच बिकट झाली आहे. वाराणसीच्या सर्व मुख्य रस्त्यांवर तसंच बाजारपेठेतही पाणी भरलं आहे. मंगळवारी संध्याकाळी पावसामुळे रस्त्यावर पाणी भरलं होतं आणि त्यामुळे एक अपघातही झाला होता. बाईकवरुन जाणारे तीन युवक एका मॅनहोलमध्ये पडले. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात आलं. मात्र दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यावर महापौरांचं असं म्हणणं आलं की, हे तरुण वेगात गाडी चालवत होते. त्यामुळे ही त्यांचीच चूक आहे.