दिल्लीतील दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस सीताराम येचुरी, स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव, अर्थतज्ज्ञ जयंती घोष, दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक आणि मानवाधिकार कार्यकर्ते अपूर्वानंद तसेच माहितीपट निर्माते राहुल रॉय यांची नावं दंगलीचा कट रचणाऱ्यांमध्ये समाविष्ट केली आहेत. यावरून सीताराम येचुरी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हा मोदी व भाजपाचा खरा चेहरा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

“ ५६ लोकं दिल्लीतील हिंसाचारात मारली गेली. भडकाऊ भाषणांचा व्हिडिओ आहे, त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? कारण सरकारने आदेश दिला आहे की कोणत्याही प्रकारे विरोधकांना गुंडाळलं जावं, हाच मोदी व भाजपाचा खरा चेहरा, नीती व विचार आहे. याचा विरोध तर होईलचं.” असं येचुरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

येचुरी यांनी अनेक ट्विटद्वारे मोदी सरकारवर टीका केली आहे. “दिल्ली पोलीस भाजपाच्या केंद्र सरकार व गृहमंत्रालयाच्या खाली काम करते. त्यांची ही अवैध आणि बेकायदा कृत्यं भाजपाच्या प्रमुख राजकीय नेतृत्वाचे चरित्र दर्शवत आहे. ते विरोधकांच्या प्रश्नांना आणि शांतीपूर्ण आंदोलनास घाबरतात आणि सत्तेचा दुरुपयोग करून आम्हाला रोखू इच्छित आहेत.”

“मोदी सरकारवर निशाणा साधत येचुरी म्हणाले, हे मोदी सरकार केवळ संसदेतील प्रश्नांनाच घाबरत नाही, पत्रकारपरिषद घेण्यासही घाबरते आणि आरटीआयची उत्तर देण्यासही – मग तो मोदींचा वैयक्तिक फंड असेल किंवा पदवी दाखवण्याची बाब, या सरकारच्या सर्व घटनाविरोधी धोरणांचा आणि निर्णयांचा आमच्याकडून विरोध सुरूच राहील.”

“आमची राज्यघटना आम्हाला केवळ सीएए सारख्या प्रत्येक प्रकारच्या भेदभावाच्या कायद्यांविरोधात शांतीपूर्ण आंदोलन करण्याचा अधिकारच देत नाहीतर, ही आमची जबाबदारी देखील आहे. आम्ही विरोधकांचे काम सुरूच ठेवणार आहोत. भाजपा सरकारने सुधारावं, आणीबाणीला आम्ही हरवलं होतं, या आपत्कालीन परिस्थितीला देखील सामोरं जाऊ.” असं देखील येचुरी यांनी सांगितलं आहे.