कम्युनिस्ट पार्टी इंडिया (एम) चे महासचिव सीताराम येचुरी यांनी देशातील करोना परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त करताना केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तुम्ही काहीच करु शकत नसाल तर खुर्ची का नाही रिकामी करत?, असा थेट सवाल येचुरी यांनी उपस्थित केलाय. येचुरी यांनी ट्विटरवरुन केंद्रावर निशाणा साधताना सध्या देशात करोनामुळे निर्माण झालेला ऑक्सिजन तुटवडा, लसीकरणासंदर्भातील गोंधळ, औषधांचा आणि बेड्सचा तुटवडा अशा अनेक गोष्टींचा संदर्भ दिलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> नव्या संसदेचं बांधकाम ‘अत्यावश्यक सेवा’; मोदी सरकारच्या निर्णयामुळे लॉकडाउनदरम्यानही काम सुरु

“तुम्ही ऑक्सिजन पुरवू शकत नाही. तुम्ही लसींचा पुरवठा करु शकत नाही. तुम्ही औषधं आणि रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध करुन देऊ शकत नाही. तुम्ही कोणत्याच पद्धतीची मदत करु शकत नाही. तुम्ही फक्त खोटा प्रचार, कारणं आणि असत्य गोष्टींच पसरवू शकता,” असा टोला येचुरी यांनी लगावला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एका शेर ही लिहिला आहे. “कुर्सी है तुम्हारा जनाज़ा तो नहीं है, कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते”, असं ट्विटच्या शेवटी येचुरी यांनी म्हटलं आहे.

मागील महिन्यामध्येच येचुरी यांचा पुत्र आशीष येचुरीचं करोनामुळे निधन झालं. येचुरी यांनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली होती. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये डॉक्टर, नर्स, पहिल्या फळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि साफसफाई कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. मुलाची काळजी घेताना त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी या लोकांनी मदत केल्याचं येचुरी म्हणाले होते. अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी, “मला माहितीय की मी एकटाच हे दु:ख सहन करत नाहीय. या साथीमुळे असंख्य लोकांचा मृत्यू झालाय,” असं म्हटलं होतं. अन्य एका ट्विटमध्ये येचुरी यांनी संसदेची नवीन इमारत बांधण्यासंदर्भातील खर्चाचा उल्लेख केलाय. “हे बांधकाम थांबवा आणि हा पैसा सर्व भारतीयांना मोफत ऑक्सिजन आणि लसी देण्यासाठी वापरा. ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही मोदींनी आपल्या अहंकारामुळे हे बांधकाम सुरु ठेवलं आहे आणि दुसरीकडे लोकं श्वास घेता येत नसल्याने मरत आहेत,” असं ट्विट येचुरी यांनी केलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही गुरुवारी केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं. नवीन संसदभवन आणि पुतळे उभारण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करता येतात आणि लसीकरणासाठी पैसे खर्च करता येत नाहीत का?, असा प्रश्न ममतांनी केंद्र सरकारला विचारला.

दिल्लीमध्ये २० हजार कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येणारं नवीन संसद भवन म्हणजेच सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टला अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित करण्यात आलं आहे. दिल्लीतील लॉकडाउनच्या कालावधीमध्येही या प्रकल्पाचं काम थांबवणार नाही यासाठी विशेष परवानगी घेऊन मालाची तसेच मजुरांची ने आण करण्याची व्यवस्था करण्यात आलीय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sitaram yechury slams modi government for construction of central vista amid covid 19 situation scsg
First published on: 07-05-2021 at 08:57 IST