आपल्याविरोधात उठणारा आवाज दडपून टाकण्याचा भाजप प्रयत्न करीत असून देशावर धर्मशासित, हिंदू राष्ट्राची हुकूमशाही कल्पना लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी गुरुवारी राज्यसभेत केला. केंद्रीय कायद्यान्वये स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठांमध्ये हस्तक्षेप करणे सरकारने थांबवावे, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली.
दलित विद्यार्थी रोहित वेमुलाची आत्महत्या आणि जेएनयूमधील अटक याचा संदर्भ देऊन येचुरी म्हणाले की, विविध केंद्रीय विद्यापीठांमध्ये घडलेल्या घडामोडी तपासण्यासाठी सभागृहाची एक समिती स्थापन करावी. धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक असलेल्या भारताला धर्मशासित हुकूमशाही हिंदू राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही येचुरी म्हणाले.
संपूर्ण विद्यार्थी वर्गावर आणि संस्थांवर टीका करू नका आणि राष्ट्रवादाची तुमची कल्पना थोपविण्याचा प्रयत्न थांबवा, असे सांगून येचुरी यांनी, काही विद्यापीठांमध्ये होत असलेला सरकारचा हस्तक्षेप बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.