पूर्व लडाखमध्ये पूर्वस्थिती पुन्हा स्थापित केली जायलाच हवी; तसेच प्रत्यक्ष ताबा रेषेवर शांतता पुन्हा स्थापन करण्यासाठी दोन्ही बाजूंनी मान्य केलेल्या करारातील सर्व मुद्दय़ांचे तुम्हाला पालन करावेच लागेल, असा ‘अतिशय स्पष्ट’ संदेश भारतीय लष्कराने १५ तासांच्या चर्चेत चिनी लष्कराला दिला, अशी माहिती सरकारी सूत्रांनी बुधवारी दिली.

दोन्ही देशांच्या वरिष्ठ कमांडरांदरम्यान झालेल्या या गुंतागुंतीच्या वाटाघाटींमध्ये, भारतीय प्रतिनिधी मंडळाने चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला (पीएलए) ‘धोक्याच्या रेषांची’ कल्पना दिली आणि या भागात एकूण परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी प्रामुख्याने चीनवर असल्याचेही सुनावले, असे सूत्रांनी सांगितले.

फौजा माघारी घेण्याचा पुढील टप्पा सुरू करण्याबाबतच्या काही कार्यपद्धतींवर दोन्ही बाजूंची सहमती झाली. मान्य झालेल्या मुद्दय़ांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर दोन्ही बाजू एकमेकांशी संपर्क साधण्याची अपेक्षा आहे, असेही सूत्रांचे म्हणणे होते. लेफ्टनंट जनरल स्तरावरील चर्चेची चौथी फेरी मंगळवारी सकाळी ११ वाजता भारतीय बाजूला चुशुल येथे झाली.

गेल्या ५ मे रोजी उद्भवलेल्या तणावानंतर दोन्ही देशांच्या लष्करांदरम्यान झालेली ही सर्वात जास्त कालावधीची बोलणी होती. ३० जूनला झालेली चर्चेची तिसरी फेरी १२ तास चालली होती. या वाटाघाटींच्या तपशिलांची लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर आणखी काही अधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत.

दरम्यान, भारतीय व लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान झालेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीत, तणाव कमी करण्यासाठी सीमेवरील आणखी फौजा परत घेण्याबाबत ‘प्रगती’ झाली असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी बुधवारी सांगितले.

राजनाथ सिंह उद्या लडाख भेटीवर

नवी दिल्ली : सीमेवरील संघर्षस्थळांवरून फौजा पूर्णपणे माघारी घेण्याबाबतच्या आराखडय़ाला अंतिम स्वरूप देण्याची भारत व चीन तयारी करत असतानाच; देशाच्या लष्करी सिद्धतेचा आणि एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे शुक्रवारी लडाखला भेट देतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी बुधवारी दिली. या भेटीत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे संरक्षणमंत्र्यांसोबत असतील. प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारत व चीन यांच्या लष्करांदरम्यान ५ मे रोजी तणाव सुरू झाल्यानंतर संरक्षणमंत्र्यांची ही लडाखला पहिली भेट असे. ३ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखचा आकस्मिक दौरा केल्यानंतर राजनाथ सिंह तेथे भेट देत आहेत. या भेटीत संरक्षणमंत्री हे लष्करप्रमुख नरवणे, नॉदर्न आर्मी कमांडर ले.ज. योगेश कुमार जोशी, १४ कॉर्प्सचे कमांडर ले.ज. हिरदर सिंह व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसमवेत सुरक्षाविषयक परिस्थिीताचा र्सवकष आढावा घेतील.