कलम ३७० काढून घेतल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत असून तेथील लोक समाधानी आहेत कारण त्यांना आता देशाच्या इतर नागरिकांप्रमाणे सुविधाही मिळणार आहेत, असे माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, की जम्मू-काश्मीरमध्ये प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रांवर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. सर्व वृत्तपत्रे कुठल्याही अडचणीशिवाय प्रकाशित होत आहेत.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० काढून घेण्याचा मुद्दा महाराष्ट्र व हरयाणातील विधानसभा निवडणुकीत वापरला जात आहे, हा विरोधकांचा आरोप फेटाळताना त्यांनी सांगितले, की कलम ३७० काढून घेण्याच्या मुद्दय़ावर लोक बोलत आहेत, आम्ही नव्हे. लोकांमध्येच त्यावर चर्चा सुरू आहे. कलम ३७० रद्द केल्याचा मुद्दा लोकांना पटला आहे. लोकांनी त्याचे स्वागत  केले आहे, त्यामुळे आम्ही तो निवडणूक मुद्दा करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

काश्मीरमधील परिस्थितीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की परिस्थिती चांगली व सुरळीत आहे. काश्मीर खोऱ्यातील लोकांनी सरकारच्या कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयास पाठिंबा दिला आहे. त्यातून त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे फायदे मिळणार असल्याने ते आनंदात आहेत. प्रसारमाध्यमांवर  कुठलेही निर्बंध नसून पत्रकार जम्मू-काश्मीरच्या कुठल्याही भागात फिरू शकतात.