नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यास महिनाभर उलटल्यानंतर राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे तेथील परिस्थिती सामान्य होत असल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी दिले.

जम्मू-काश्मीरमधील दूरध्वनी सेवा बहाल करण्यात आल्या असून, शाळा व आरोग्य संस्था पूर्णपणे कार्यरत आहेत. सर्व बँका व एटीएम सुरू असून, राज्यातील बँकांमधूनन १.०८ कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे, असे गृहंमत्रालयाने राज्यातील परिस्थितीबाबत दिलेल्या माहितीत सांगितले.

या माहितीनुसार, सर्व आरोग्य संस्था पूर्णपणे कार्यरत असून, या ठिकाणी ५१०८७० बाह्य़रुग्ण तपासण्यात आले आणि १५१५७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कुपवाडातील पोस्टपेड मोबाइल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.

प्राथमिक गरजेच्या वस्तू उपलब्ध नसल्याच्या शंका फेटाळून लावत, पेट्रोलियम उत्पादने व अन्नधान्य यांचा पुरेसा साठी असून, ६ ऑगस्टपासून या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी ४२६०० हून अधिक ट्रक येथे आल्याचे सरकारने सांगितले.सरकारने काश्मीरबाबत अलीकडेच केलेल्या उपाययोजना घटनेच्या चौकटीत असून, जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये प्रागतिक उपाययोजना पूर्णपणे लागू केल्या जातील असे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी सरकारने ही विस्तृत माहिती दिली आहे. जम्मू-काश्मीरचे नागरी प्रशासन मूलभूत सेवा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, संस्थांचे सामान्य संचालन, दळणवळण आणि जवळजवळ पूर्ण कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करत असल्याचेही परिषदेला सांगण्यात आले.