दंगलग्रस्त मुझफ्फरनगरमधील तीन भागांतील संचारबंदी दोन तासांसाठी उठवण्यात आली. मुझफ्फरनगरसह उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्य़ांतील दंगलींमधील मृतांची संख्या ३८वर पोहचली आहे.
मुझफ्फरनगरात नव्याने हिंसाचाराची घटना घडलेली नाही. त्यामुळे दुपारी दोन तासांसाठी काही भागांतील संचारबंदी उठवण्यात आली.
गेल्या तीन दिवसांच्या या दंगलींत मुझफ्फरनगरमध्ये ३२, मेरठमध्ये २ तर हापुर, बागपत, सहारणपूर आणि शाल्मली येथे प्रत्येकी एकजण ठार झाला आहे. जखमींचा आकडा ८१ असून ३६६ समाजकंटकांना अटक करण्यात आली आहे. भाजपचे विधिमंडळ पक्षाचे नेते हुकूमसिंग, आमदार सुरेश राणा, भारतेंदु, संगीत सोम आणि काँग्रेसचे माजी खासदार हरेंद्र मलिक यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे, असा दावा गृहसचिव कमल सक्सेना यांनी केला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दंगेखोरांवर कठोर कारवाईची हमी दिली आहे. दंगलीच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती विष्णु सहाय यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नेमलेल्या एकसदस्यीय आयोगाला दोन महिन्यात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.
मुझफ्फरनगर दंगलग्रस्तांना पंतप्रधानांचे अर्थसाह्य़
नवी दिल्ली : मुजफ्फरनगर दंगलीत ठार झालेल्या मृतांच्या कुटुबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे साह्य़ पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी जाहीर केले आहे. मुझफ्फरनगरमधील परिस्थितीबाबत दर १२ तासांनी अहवाल देण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला सांगितले आहे. या दंगलींमागे कट असल्याचा आरोप मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. तर एकगठ्ठा मतांच्या लालसेपायी मुख्यमंत्री या दंगलींचा राजकीय फायदा उठवू पाहात आहेत, असा आरोप करीत भाजप, बसप आणि राष्ट्रीय लोकदल या विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.