शुक्रवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी बँकॉक शहर हादरून गेलं. तब्बल सहा वेगवेगळ्या ठिकाणी शुक्रवारी बँकॉक शहरात बॉम्बस्फोट झाले. सकाळी 9 वाजता बँकॉकमध्ये पहिला बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 4 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, साऊथइस्ट आशियाई देशांची सुरक्षाविषयक बैठकीच्या पार्श्वभूमीवर हे बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गर्दीच्या वेळी सकाळी 9 वाजता सेंट्रल बँकॉकमध्ये दोन बॉम्बस्फोट करण्यात आले. तर पुढील काही वेळातच शहरातील उत्तरेकडील भागात असलेल्या सरकारी इमारतीजवळ तिसरा बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर अन्य तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. दरम्यान, यामध्ये चार जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती इरवान मेडिकल सेंटरद्वारे देण्यात आली. चार जखमीपैकी तीन महिला सफाई कर्मचारी असल्याची माहिती स्थानिक माध्यमांकडून देण्यात आली.

दरम्यान एकूण सहा ठिकाणी हे बॉम्बस्फोट झाली असल्याची माहिती पोलीस कर्नल कामतोर उइचरायन यांनी दिली. तसेच स्फोटांदरम्यान एक बॉम्ब निकामी करण्यात आल्याचेही ते म्हणाले. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नाही. थायलंडच्या पंतप्रधानांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. देशाची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि शांतता भंग करण्यासाठी असे प्रकार घडवले जात आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश दिले असल्याची माहिती थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा यांनी ट्विटरद्वारे दिली.